पंचवटी : कारचालकाला मारहाण करून लुटले; पाच जणांना अटक
स्थानिक बातम्या

पंचवटी : कारचालकाला मारहाण करून लुटले; पाच जणांना अटक

Gokul Pawar

नाशिक । इनोव्हा कारमधून आलेल्या चार ते पाच संशयित दरोडेखोरांनी ‘आमच्या कारला कट का मारला? अशी कुरापत काढून बीएमडब्ल्यू कारमधील दोघांना मारहाण करून त्यांन लुटल्याची घटना (दि.3) रात्री अकरा वाजता घडली. या प्रकरणी संशयितांविरूद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात दरोडा, अपह्ररण, मारहाण व नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलीसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.

नितीन भैयासाहेब देशमुख (45 रा. घर नं. 1408 बी सम्राट, गोकुळधाम सोसायटी, हिरावाडी पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार संशयित रूपेश रत्नाकर कोठुळे (35, रा. दत्तनगर, पेठरोड, पंचवटी), आतिष अनिल चौघुले (30, रा. दत्तनगर, पंचवटी), अजय विजय निकम (30, रा. फुलेनगर, अवधुतवाडी, पंचवटी) यांनी मंगळवारी रात्री अकरा वाजता एमएच-14-7071 या क्रमांकाच्या इनोव्हा कारमध्ये येऊन तारवाला नगर सिगनलजवळ नितीन देशमुख यांच्या एमएच-15 सीएम-0022 या क्रमांकाच्या बीएमडब्ल्यू कारला इनोव्हा आडवी मारली.

त्यानंतर देशमुख व त्यांचे मित्र संतोष तुपसाखरे आणि अजित जाधव यांना लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली. त्यानंतर येथून देशमुख यांच्यासह त्यांच्या मित्रांना बळजबरीने इनोव्हा कारमध्ये टाकून बीएमडब्ल्यू कारची चावी ताब्यात घेऊन मखमलाबाद रोडवरील पॅराडाईज लॉन्स येथे नेले. येथे संशयित जय कोठुळे याने देशमुख यांच्या पोटाला चाकू लावून ‘तुझ्या खिशात असेल तेेवढे पैसे काढुन दे, नाहीतर तुला कापून टाकतो,’ अशी धमकी दिली. यावरच न थांबता सर्व संशयितांनी चौघांंना पुन्हा बेदम मारहाण केली व बीएमडब्ल्यू कारची पुढील काच फोडून बोनेटवर दगड मारून नुकसान केले.

यानंतरही संशयित निकम याने देशमुख यांना एटीएम सेंटरमध्ये घेऊन जाऊन बळजबरीने पाच हजार रूपये काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी तपास करून घटनेतील संशयितांना पंचवटी परिसरातून अटक केली. आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. सी. कासर्ले करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com