कोरोना विषयी जनजागृती करीत हळदीच्या दिवशीच उरकले लग्न

कोरोना विषयी जनजागृती करीत हळदीच्या दिवशीच उरकले लग्न

नवीन नाशिक । घरातील मंगलकार्य म्हटले की सर्वांचाच आनंद शिगेला पोहोचतो. लग्नाचा दिवस कधी उगवतो व त्या दिवसाची हौस मौज, मजा सर्वांना हवी हवीशी वाटत असते. याच उद्देशाने पंचांगाप्रमाणे तारखा घेऊन अनेक वधू व वरांचे पिता आपल्या सोयीनुसार तारखा निश्चित करीत असतात. अनेकांनी अशाच तारखा बुक केलेल्या असताना चीनमधील एका व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. त्याचाच फटका शुभविवाह कार्यालाही बसला असून लग्नातील आनंदाला मुकावे लागले आहे.

अनेकांनी करोनाची धास्ती घेत शासनाच्या आदेशाप्रमाणे आपल्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करून घेतले. काहींनी कार्यक्रम रद्द केले तर ओढावलेला बाका प्रसंग बघता आपणही आपल्या राज्याचे व देशाचे देणे लागतो यासाठी त्याग करण्याची भूमिका ठेवली. यातीलच एक उदाहरण म्हणजे मकरंद पवार यांचे.

मकरंद पवार व सपना जगताप यांच्यामध्ये दिनांक 19 मार्चचा दुपारी लग्नसोहळा निश्चित झाला होता. परंतु अचानक उद्भवलेल्या आपत्तीमुळे व निघालेल्या आदेशामुळे सर्वांचीच पंचाईत झाली.

काहिंनी तारीख पुढे ढकलण्याची तर काहिंनी लग्न तूर्त रद्द करण्याची सूचनाही केली. परंतु सामाजिक बांधिलकी जोपासत दोनही परिवारांनी आपल्या आनंदाला फाटा देत हळदीच्या दिवशीच ठराविक नातेवाईकांसह लग्न समारंभ उरकून घेतला. लग्न समारंभ उरकून घेतानाही ठराविक अंतराने नातेवाईकांना उभे राहण्याच्या सूचना करण्यात येऊन व कुठलाही धुमधडाका न करता मंगल अष्टकांमध्ये दोघांचा विवाह उपस्थितांच्या अक्षतांनी झाला.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन करत या ठिकाणी उपस्थितांना करोना विषयी माहिती देत व त्यापासून दक्षता घेण्याचे आवाहनही कुटुंबियांच्या वतीने करण्यात आल्याने एक आगळा वेगळा सोहळा सर्वांसाठी आदर्श बनला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com