उद्यापासून दोन दिवस राज्यातील सर्व गोष्टी बंद; नागरिकांनो घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई : सध्या लॉक डाऊन नियमांमध्ये काही शिथिलता देण्यात आली आहेत, मात्र आता पुढचे दोन दिवस या नियमातील सर्व गोष्टी बंद असणार आहेत. जिथे उद्योग-धंदे सुरु झाले आहेत, त्यांनी उद्या-परवा बंद ठेवावे, वादळ ज्या भागात आहेत, त्या ठिकाणी, किनारपट्टीच्या भागात कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टी वर हे वादळ घोंघावत असून (दि.०३) रोजी दुपारी मुंबईवर धडकणार आहे. या वादळामुळे होणारा पाऊस व त्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीचे गणित ठरवून राज्य प्रशासनाने सर्व उपाययोजना केल्या आहेत.

आज या वादळाच्या उपययोजनांबाबत राज्यमंत्री मंडळाची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चक्रीवादळासंबंधी जनतेशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातील उद्धव ठाकरे यांनी अमित शाह व पीएम नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद झाला असून दोघांनीही राज्याला मदतीचे आश्वासन दिल्याची माहिती दिली.

मुंबईपासून रायगड सिंधुदुर्गापर्यंत सर्वांनी काळजी घ्यायची आहे. मच्छीमारांना परत बोलावण्यात आले आहे. अशावेळी घराभोवती इतःस्तत पसरलेल्या गोष्टी गोळा करून ठेवा. आवश्यकता नसल्यास विजेची उपकरणे वापरू नका, बॅटरीवर चालणारी उपकरणे चार्ज करून ठेवा, जेणेकरून वीज पुरवठा खंडित झाला तरी अडचण येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शेवटी ते म्हणाले की, ‘करोनाचे संकट रोखून त्याला परतवण्याच्या मार्गावर आहोत, आता हे वादळाचे संकटही परतवून लावू. धैर्याने त्याचा सामना करु, संकटाच्या छाताडावर पाय ठेवून ते परतवून लावू’, असे उद्गार काढले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *