Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकजुन्या नाशकातील अजमेरी चौक, कादरी चौक सील; तर नाईकवाडीपुरा प्रतिबंधित क्षेत्र

जुन्या नाशकातील अजमेरी चौक, कादरी चौक सील; तर नाईकवाडीपुरा प्रतिबंधित क्षेत्र

जुन्या नाशकातील अजमेरी चौक, कादरी चौक सील; तर नाईकवाडीपुरा प्रतिबंधित क्षेत्र

जुने नाशिक : दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्ण यामुळे जुने नाशिक भागातील नाईकवाडीपुरा सध्या हॉटस्पॉट बनले आहे. याठिकाणी काही जणांचे मृत्यू झाल्यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेत आज येथील अजमेरी चौक, कादरी चौक सह काही भाग सील केले. तसेच नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी संतप्त नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना घेराव घालून आपल्या व्यथा मांडल्या. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

- Advertisement -

दरम्यान महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विशेष आदेश काढून नाईकवाडी पुरा परिसर संपूर्ण प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.

यामुळे आता या ठिकाणी नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येऊन ये-जा करणाऱ्या लोकांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. अत्यंत अत्यावश्यक काम असल्यावरच नागरिकांनी बाहेर पडावे तसेच पोलिसांनी व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, कोणीही इतरत्र फिरू नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, बागवानपुरा, मोठा राजवाडा तसेच पखाल रोड आदी भागात रोज नवीन रुग्ण मिळत आहे. आतापर्यंत याच भागातून सर्वात जास्त रुग्ण मिळाल्याने जुने नाशिक एक प्रकारे हॉटस्पॉट होत आहे. वडाळा गावानंतर आता प्रशासनाचे संपूर्ण लक्ष जुने नाशिक वर केंद्रित झाले आहे. मदिना चौक भागात एका नगरसेवकाच्या भावाचा पॉझिटिव्ह अहवाल मिळाला होता, तर एका माजी नगरसेवकावर देखील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर त्यांच्या दोन मुलांनादेखील बाधा झाल्याचे समजते.

त्याचप्रमाणे कोकणीपूरा व खतीब वाडा या भागात देखील करोनाचे रुग्ण मिळाल्याने संपूर्ण परिसरात विशेष औषध फवारणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे नाईकवाडी पुरा भागातील एकाच कुटुंबातील अठरा व एका दुसऱ्या कुटुंबातील बारा जणांवर उपचार सुरू असल्याने संपूर्ण परिसर आज सील करण्यात आला.

येथील आतापर्यंत सुमारे तीस लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर आणखी काही लोकांना बाधा झाल्याचे समजते तर यातील काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे.  महापालिकेच्या पूर्व विभागाच्यावतीने संपूर्ण परिसर सील करण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये अजमेरी चौक भागापासून येणारे सर्व मार्ग तसेच कादरी चौक येथील सर्व मार्ग बांबू व इतर साहित्य लावून सील करण्यात आले.

सकाळी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे तसेच भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे व स्थानिक नगरसेवक गजानन शेलार यांनी परिसरातील लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. तसेच परिसर सिल करण्यात येत असल्याची माहिती दिली.

मशिदीच्या भोंग्यावरून आवाहन

जुने नाशिक भागातील नाईकवाडीपुरा परिसरात मागील काही दिवसांपासून कम्युनिटी स्प्रेड प्रमाणे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे करुणा प्रभाव रोखण्यासाठी ही साखळी तोडणे गरजेचे आहे. म्हणून आज महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिस अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लोकांना याबाबत आवाहन केले. या ठिकाणी असलेल्या जुमा मशिदीचे सर्व  ध्वनिक्षेपक सुरू करून त्याच्या माइक बाहेर काढण्यात आला. या ध्वनिक्षेपकावरून प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा आवाहन केले.

लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना घेराव

याभागात मागील काही काळात अनेक जणांचा मृत्यू झाला. यामध्ये काही जणांच्या अहवाल पॉझिटिव्ह आला तर काही जणांना इतर रुग्ण होते असे सांगण्यात आले. रात्रीच्या वेळी उपचारासाठी नागरिकांना ताब्यात घेण्यात येतो व सकाळी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. म्हणून आज नाईकवाडीपुरा भागात आलेल्या नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकारी यांना नागरिकांनी घेराव घालून जाब विचारला. यामुळे काही काळ तणाव देखील निर्माण झाला होता, मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी समाधानकारक उत्तर दिल्यामुळे नागरिक परत आपापल्या घरी  परतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या