
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेले असतानाही विनाकारण भटकंती करणाऱ्या २०६ वाहनाचलकांवरशहर वाहतूक शाखेने कारवाई करत त्यांच्याकडून ५७ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी परवानगी घेवून बाहेर पडावे अन्यथा घरीच थांबावे, सोशल डिस्टनस ठेवावा, असे आवाहन पोलीस करत आहेत. तरीही, काहीजण आदेशाचे उल्लंघन करत आहेत.
अनेकजण किराणा, भाजी पाला, मेडिकल अशी कारणे पुढे करत आहेत. परंतु हे सर्व त्या त्या भागात थोड्या अंतरावर असल्याने वाहनांची गरज नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरीही विनाकारण भटकंती करणाऱ्या २०६ वाहनचालकांवर सोमवारी (दि.६) शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यांच्याकडून ५७ हजार ३०० रुपये दंड वसूल केला.
वाहनचालकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर जाताना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. अन्यथा अधिक कडक कारवाई करण्याचा इशारा सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी यांनी दिला आहे.