‘आप’च्या प्रचारासाठी नाशिकची टीम दिल्लीत
स्थानिक बातम्या

‘आप’च्या प्रचारासाठी नाशिकची टीम दिल्लीत

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । कुंदन राजपूत
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या निवडणुकीचे रणांगण तापले आहे. देशभरातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी दिल्ली गाठली आहे. नाशिकच्या आम आदमी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी देखील दिल्लीत तळ ठोकला आहे. दहा ते पंधरा जणांची टीम दिल्लीच्या गल्लीबोळात जाऊन पक्षाने केलेले काम मतदारांपर्यत पोहचवत आहे. दिल्लीकर देखील‘अच्छे बिते पाच साल, लगे रहो केजरीवाल’ म्हणत त्यांचा उत्साह द्विगुणित करत आहे.

दिल्लीतील 70 जागांसाठी येत्या 8 फेबु्रवारीला मतदान होणार आहे. तर, 11 फेबु्रवारीला मतमोजणी होणार असून ‘दिल वालो की दिल्ली’ कोणाची याचा फैसला होईल. सत्ताधारी आम आदमी पक्ष विरुध्द भाजप असे वरवर चित्र आहे. मात्र,थेट लढत ही मुख्यमंत्री केजरीवाल विरुध्द पंतप्रधान मोदी व मोटा भाई अमीत शाह अशी आहे. भाजपच्या प्रचारासाठी मैदानात मंत्री, संत्रींचा ताफा उतरला आहे. तर, दुसरीकडे आम आदमी पक्षाचे देशभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या प्रचारासाठी रणांगणात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यात डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर आदींचा समावेश आहे.

नाशिक शहरातील आम आदमी पक्षाचे स्वप्निल घिया, फैजान अहमद, एकनाथ सावळे, ईश्वर पाटील, गिरिश उगले आदीं पदाधिकारी प्रचारासाठी दिल्लीत पोहचले आहे. नाशिकच्या टीमकडे शकुरबस्ती व करावल नगर या दोन मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शकुरबस्ती हा आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचा मतदारसंघ आहे. तर, करावल नगर हा कपिल मिश्रा यांचा मतदारसंघ होता. मात्र, त्यांनी भाजपात प्रवेश केला. आम आदमी पक्षाने येथून महाराष्ट्राचे प्रभारी दुर्गेश पाठक यांना मैदानात उतरवले आहे. नाशिकची टीम या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहे.

हातात पक्षाचे चिन्ह असलेला झाडू व डोक्यावर टोपी घालून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेले पाच वर्षातील कामे मतदारांपर्यंत पोहचवत आहे. त्यात शाळांचा बदललेला चेहरा मोहरा, अंतराष्ट्रीय दर्जाच मोफत शिक्षण, गल्ली बोळात मोहल्ला क्लिनिक, महिलांसाठी मोफत बससेवा, 280 युनिट मोफत वीज आदी कामाच्या जोरावर पक्षासाठी मतांचा जोगवा मागत आहे. मतदार देखील नाशिकच्या टीमचे उत्साहाने स्वागत करुन ‘फिर एक बार केजरीवाल’ अशी साद देत आहे. पुढील आठवडयात नाशिकची दुसरी टीम प्रचारासाठी दिल्लीला कूच करणार आहे.

पक्षासाठी 2013 व 2015 विधानसभा निवडणुकीत यापुर्वी प्रचार केला आहे. तसेच, 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीसाठी देखील प्रचारासाठी दिल्लीला गेलो होतो. नाशिकहून आलो असे सांगितल्यावर मतदार उत्स्फूर्तपणे स्वागत करतात. दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार येईल.
– स्वप्निल घिया, उ.महा.प्रमुख युथ विंग, आप

Deshdoot
www.deshdoot.com