निसर्ग झाला मंडप अन फुले झाली अक्षता; दहा जणांच्या साक्षीने पार पडला विवाह
स्थानिक बातम्या

निसर्ग झाला मंडप अन फुले झाली अक्षता; दहा जणांच्या साक्षीने पार पडला विवाह

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : एक ब्राम्हण, वर, वधू यांसोबत एकूण दहा वऱ्हाडी… दुपारचं ऊन आणि आंब्याच्या झाडाची सावली साक्षीला.. वाजंत्री म्हणून पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज अशा नैसर्गिक वातावरणात सय्यद पिंपरी येथील तरुण दीपक आणि माधुरी या नव दाम्पत्याने लग्नाची गाठ बांधली.

दीपक हा जिल्ह्यातील नामांकित सह्याद्री फार्म येथे प्रोडक्शन सुपरवायझर या पदावर आहे तर माधुरी हि जिल्ह्यातील नामांकित महात्मा गांधी शिक्षण संस्थेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात गणित विषयाची प्राध्यापक आहे.
करोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. यामुळे यंदा काही लग्न रद्द झाले तर ज्यांना धुमधडाक्यात करावयाचे आहेत त्यांनी पुढे ढकलले आहे.

अशातच या नव्या विचाराच्या दाम्पत्याने मित्र मंडळी, नातलग, शाही बडेजाव या सर्वांना योग्य फाटा देत असे निसर्गाच्या सानिध्यात मोजक्यात मंडळीच्या साक्षीने लग्न करून निश्चितच समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

यापूर्वीच सोशल मिडियावर दीपक आणि माधुरी यांनी आपल्या मित्रमंडळी, नातलग यांना पत्रिका पाठवली आणि पत्रिकेत ठळक अक्षरात घरी राहूनच आम्हला शुभाशीर्वाद द्या असे लिहिले होते.

मूळ चांदवड तालुक्यातील उसवाड गावच्या गायकवाड कुटुंबातील माधुरी. गेल्या वर्षीच त्यांच्या घरावर काळाने झडप घातली प्रा. माधुरी यांच्या आई वडिलांचे ठरविक अंतराने दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे माधुरी आपल्या आजोळी सय्यद पिंपरी येथे येऊन स्थायिक झाल्या. तर दीपक हा सय्यद पिंपरी येथील शेतकरी चंद्रभान शिरसाठ यांचा मुलगा.

पुरोगामी विचारसरणीच्या या दोन्ही कुटुंबीयांनी या काळात आतिशय सध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तो तडीस नेला. मोजकीच मंडळी असल्याने घरातील स्त्रियांनी साधेपणाने जेवण बनवून लग्न सोहळ्याची सांगता केली.

गावात या लग्नाची बातमी पसरताच गावातील मंडळी नव दाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी यायला लागली तोवर लग्न समारंभ आटोपला होता. या प्रकारे लग्न करून नवदाम्पत्याने पर्यायाने सय्यद पिंपरी गावाने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com