मुंबईतील रुणवाल परिवारातर्फे नामको हॉस्पिटलला ७७ लाखांची देणगी
स्थानिक बातम्या

मुंबईतील रुणवाल परिवारातर्फे नामको हॉस्पिटलला ७७ लाखांची देणगी

Gokul Pawar

नाशिक : करोनासारख्या संकटकाळातही अखंड रुग्णसेवा देत असलेल्या नामको रुग्णालयाला मुंबईतील प्रसिद्ध रुणवाल ग्रुपचे चेअरमन सुभाषचंद्र रुणवाल यांनी ७७ लाखांची देणगी दिली आहे. धुळ्यातील मातृभूमीचे बंध आणि सामाजिक बांधिलकीतून त्यांनी केलेली ही मदत आर्थिक दुर्बल कॅन्सर पिडीतांसाठी वरदान ठरणार आहे. रुग्णवाल यांनी ७७ वर्षे पूर्ण करुन ७८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत शनिवारी (दि.२३) ही मदत केली.

कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करुन देतानाच अन्य आजारांसाठी मल्टिस्पेशालिटी विभाग सेवेत आणलेल्या नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नामको हॉस्पिटलने उत्तर महाराष्ट्रातील हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत. करोनासारख्या संकटकाळातदेखील ही रुग्णसेवा कायम आहे.

नामको रुग्णालयात कॅन्सर उपचारांसाठी महत्त्वाची उपचार पद्धती असलेल्या रेडिएशन विभागासाठी त्यांनी ही देणगी दिली आहे. त्यामुळे या विभागातील निदान व उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रणांच्या उपलब्धतेसाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. परिणामी रुणवाल कुटुंबाची ही मदत नाशिकच नव्हे तर ग्रामीण भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील कॅव्सर पिडीतांवरील उपचारांसाठी बहुमोल ठरणार आहे.

सुभाषचंद्र रुणवाल यांचा शनिवारी ७८ वा वाढदिवस होता. वयाची ७७ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त त्यांनी ७७ लाखांची मदत केली. नामको परिवाराला ही मदत मिळवून देण्यात धुळ्यातील नंदलाल रुणवाल आणि मुंबईतील मदनलाल साखला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संकटकाळात मोलाची मदत

करोनासारख्या आपत्तीप्रसंगी जेथे रुग्णसेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे, अशा काळात रुणवाल परिवाराने दिलेली ही मदत निश्चितच मोलाची ठरणार आहे. समाजातील गरीब, गरजू रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करुन देण्याचा आमच्या सेवाकार्याला एकप्रकारे पाठबळच लाभले आहे.
– सोहनलाल भंडारी, अध्यक्ष, नामको चॅरिटेबल ट्रस्ट

रुग्णालयासाठी महत्त्वपूर्ण योगदान
रुणवाल परिवाराने दिलेली ही मदत रुग्णालयात सुरू असलेले आधुनिकीकरण आणि रुग्णसेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आजवर अखंड सुरू असलेल्या रुग्णसेवेचा यामुळे विस्तार होण्यात निश्चितच पाठबळ मिळेल.

करोनासारख्या संकटकाळात अनेक संस्था आर्थिक आव्हानांना तोंड देत असताना, रुणवाल यांची मदत ही खरोखरच दातृत्त्वाचा एक आदर्श ठरावी.
– शशिकांत पारख, सेक्रेटरी, नामको चॅरिटेबल ट्रस्ट

Deshdoot
www.deshdoot.com