चारा छावण्याचे 57 कोटींचे अनुदान प्राप्त
स्थानिक बातम्या

चारा छावण्याचे 57 कोटींचे अनुदान प्राप्त

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । जिल्ह्यात दुष्काळात दहा चारा छावण्या सुरू होत्या. त्यात हजारो लहान मोठे पशु दावणीला बांधण्यात आले होते. शासनाकडून या चारा छावण्याचे 57 कोटी 21 लाख 97 हजारांचे अनुदान प्राप्त झाले आहे. तब्बल चार महिने उशिराने हे अनुदान मिळाले. जिल्हास्तरावरून या अनुदानाच्या चारा छावण्या संस्थांना त्याचे वाटप केले जाणार आहे.

नाशिकसह विभागातील पाच जिल्ह्यांत मे ते ऑगस्ट 2019 या कालावधीत लहान-मोठ्या जनावरांना पुरविलेल्या चार्‍याचे अनुदान चार महिने विलंबाने का असेना, विभागीय आयुक्तालयाला प्राप्त झाले आहे. यंदा जिल्ह्यात भयाण दुष्काळ पडला होता. जनारांना चारा व पाण्याची कमतरता निर्माण झाली होती. पशुधन जगवायचे कसे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला होता. त्या पार्श्वभूमीवर शासनाने आवश्यक तेथे चारा छावण्या सुरू केल्या होत्या. जिल्ह्यात सिन्नर, येवला, नांदगाव आणि मालेगाव या चार तालुक्यांमध्ये तब्बल दहा चारा छावण्या सुरू करण्यात आल्या.

या छावण्यांमध्ये जनावरांची निवार्‍याची आणि चारापाण्याची व्यवस्था करण्यात आली. या छावण्यांमध्ये 11 हजार 650 लहान-मोठी जनावरे दावणीला होती. छोट्या जनावरांसाठी प्रतिदिन 50 रुपये, तर मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन 100 रुपये याप्रमाणे चार दर निश्चित करण्यात आले होते. चारा छावणीवर झालेल्या खर्चाची देयके अदा करण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी विभागीय आयुक्त कार्यालयातून सरकारकडे करण्यात आली होती.

त्यानुसार महसूल आणि वन विभागाने खरीप हंगामातील दुष्काळी भागातील चारा छावण्यांसाठी 57 कोटी 21 लाख 97 हजार 934 रुपयांचा निधी पाठविला आहे. नाशिकसह जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांची मागणी लक्षात घेऊन तेथील जिल्हाधिकार्‍यांकडे विभागीय आयुक्तालयाद्वारे सोमवारपासून निधी वितरित केला जाणार आहे.

छावणी चालविणार्‍या संस्थांना इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सर्व्हिसेसद्वारे हा निधी वितरित करण्यात येणार आहे. निधी वितरित झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र तत्काळ सादर करावे, असे आदेश कार्यासन अधिकारी प्राची पालवे यांनी दिले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com