नाशिक विभागातून ४०७ रूग्ण करोनामुक्त; जिल्ह्यात सर्वाधिक करोनामुक्त

नाशिक विभागातून ४०७ रूग्ण करोनामुक्त; जिल्ह्यात सर्वाधिक करोनामुक्त

नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक विभागातील प्रत्येक जिल्हा प्रशासन आपल्या पातळीवर कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

आज प्राप्त झालेल्या नाशिक विभागातून पाचही जिल्ह्यातील ४०१ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. नाशिक विभागातून १० हजार १७० करोना संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी विभागात एकूण ८ हजार १९४ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ८३७ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्राप्त झाली आहे.

विभागात सर्वाधिक २९१ कोरोनामुक्त रूग्ण नाशिक जिल्ह्यात झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात घेण्यात आलेल्या ३ हजार ८२८ स्वॅबच्या नमुन्यांपैकी ३ हजार ९ तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर ७६ अहवाल प्रलंबित आहेत.

जळगाव जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या २ हजार ३५२ स्वॅब नमुन्यांपैकी १ हजार ६८३अहवाल निगेटीव्ह आले असून ४३९ अहवाल अप्राप्त आहेत. तर २९ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात प्राप्त माहितीनुसार १ हजार ७८३ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ६८० निगेटीव्ह आले असून कोरोनामुक्त ४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २१ अहवाल प्रलंबित आहेत.

धुळे जिल्ह्यातील १ हजार २८५ कोरोना संशयितांचे घेण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी १ हजार ३३ संशयिताचें अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या ३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून १८० अहवाल प्रलंबित आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातून एकूण ९२३ स्वॅब नमुन्यांच्या तपासणीत ७८९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. १११ संशयितांचे अहवाल प्रलंबित असून १० रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना घरी सोडण्यात आहे.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हा रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयात तसेच खाजगी रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन खाजगी रूग्णालयांमधील सुविधा देखील सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सुचना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने जिल्हा पातळीवर देण्यात आल्या आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com