भुजबळांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी 34 कोटींची तरतूद
स्थानिक बातम्या

भुजबळांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी 34 कोटींची तरतूद

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । जिल्हयाच्या विकासाला चालना देणार्‍या व पालकमंत्री छगन भुजबळ यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गंगापूर धरण येथील बोटक्लबसह इतर पाच योजनांसाठी आगामी जिल्हा नियोजन आराखड्यात 34 कोटी रुपये जादा निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, 185 कोटी 24 लाखांच्या वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे.

पालकमंत्री भुजबळांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.27) जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली. त्यास जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, लोकप्रतिनिधीसह अधिकारी उपस्थित होते. दहा दिवसांपुर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अवघा 23 टक्के निधी खर्च झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे भुजबळांनी आज पुन्हा बैठक घेत किती निधी खर्च झाला याचा आढावा घेतला.

सन 2019 – 20 या आर्थिक वर्षासाठी 791 कोटी 24 लाखांचा आराखडा होता. पुढील 2020 – 21 वर्षासाठी आराखड्यात घट होऊन तो 733 कोटी इतका आहे. जिल्हयाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी विविध मागण्या केल्या आहे. त्यासाठी जवळपास 185 कोटी 24 लाख जादा निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे 185 कोटी जादाची निधीची मागणी शासनाकडे करण्यात येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

त्यात भुजबळ यांचे डी्रम प्रोजेक्ट असलेल्या गंगांपूर धरण बोट क्लब, कलाग्राम, शिवाजी स्टेडियम नूतनीकरण, जिल्हा निर्मिती शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष उत्सव व अंजनेरी येथे साहसी प्रशिक्षण केंद्र निर्मिती या प्रकल्पांचा देखील समावेश आहे. या योजनांसाठी 34 कोटी निधीची मागणी शासनाकडे केली जाणार आहे. वरील वाढीव निधींमुळे येत्या आर्थिक वर्षाचा जिल्हयाचा नियोजन आराखडा हा 918 कोटींच्या घरात जाणार आहे.

ड्रीम प्रोजेक्टसाठी निधी

प्रकल्प निधी (कोटीत)
बोट क्लब 1÷
कलाग्राम 7
शिवाजी स्टेडिअम 20
जिल्हयास 150 वर्ष 5
साहसी प्रशिक्षण केंद्र 1

Deshdoot
www.deshdoot.com