Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिकमधून परजिल्ह्यात पोहचविली ३०० टन द्राक्ष; जय बाबाजी परिवाराचा अनोखा उपक्रम

नाशिकमधून परजिल्ह्यात पोहचविली ३०० टन द्राक्ष; जय बाबाजी परिवाराचा अनोखा उपक्रम

ओझर : द्राक्ष उत्पादकांसमोर उत्पादनापूर्वी प्रथम अतिवृष्टीचे संकट आणि त्यातून सावरून माल तयार झाला तर करोनाच्या लॉकडाऊनमुळे विक्रीचे दुहेरी संकट. एकीकडे काढणीसाठी मजूर भेटेना, व्यापारीही दर देईना, यामुळे उत्पादन खर्चही वसूल होईना अशी मोठी कोंडी शेतकऱ्यांची झाली.

याच दरम्यान जिल्ह्यातील काही द्राक्ष उत्पादकांनी निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्याकडे व्यथा मांडली. महाराजांनी याची त्वरित दखल घेऊन द्राक्ष उत्पादकांना धीर देण्यासाठी पुढाकार घेतला. थेट बांधावरून तब्बल ३०० टन द्राक्षाचा पुरवठा जळगाव, औरंगाबाद, जालना, धुळे व अहमदनगर जिल्ह्यात आश्रमाच्या स्वखर्चाने केला अन अशा अडचणीच्या काळात दुपटीचा दरही उत्पादकांना मिळवून दिला.

- Advertisement -

करोनाच्या लॉकडाऊमुळे द्राक्ष दरात मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना सहन करावा लागला. चालू वर्षी द्राक्षाच्या दरात घसरण झाल्याने उत्पादन खर्चही वसूल करणे अवघड झाले. याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी आडून पहात ७ ते १० रुपये प्रतिकिलो दरम्यान माल खरेदी केला.

या परिस्थितीमुळे द्राक्ष उत्पादक तणावाखाली होते. दरात मोठी घसरण झाली असताना मार्ग काढण्यासाठी निफाड तालुक्यातील चितेगाव येथील संजय दाभाडे यांच्यासह जिल्ह्यातील ठीक-ठिकाणच्या द्राक्ष उत्पादकांनी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या कडे आपली व्यथा मांडली.

महाराजांनी याची त्वरित दाखल घेऊन नियोजन केले. आश्रमाच्या ‘निष्काम कर्मयोग’ या तत्वाप्रमाणे काम हाती घेतले. शेजारील जिल्ह्यातील थेट भाविकांच्या घरापर्यंत ताजी द्राक्ष पोहचण्यासाठी नियोजन आखले. याकामी लागणारे मनुष्यबळ, वाहन व्यवस्था व त्यासाठी लागणारे इंधन स्वतः आश्रमाच्या वतीने खर्च केले. यासाठी शेतकऱ्यांकडून कुठलाही खर्च घेण्यात आलेला नाही.

आश्रमाचे अध्यात्मिक व सामाजिक संघटन असलेल्या जय बाबाजी भक्त परिवारामार्फत थेट बागेतून ५ किलो वजनाच्या द्राक्ष पेट्या तयार केल्या आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये ग्राहकांच्या थेट घरापर्यंत विना मोबदला प्रतीपेटी १०० रुपये याप्रमाणे वितरण केले. त्यामुळे उत्पादकांना दुपटीचा दर या अडचणीच्या काळात मिळाला.

प्रामुख्याने निफाड तालुक्यातील चितेगाव, कसबे सुकेणे, ओझर मिग, चांदोरी, पिंपळस रामाचे, नैताळे, खेरवाडी, दिंडोरी तालुक्यातील जानोरी व नाशिक तालुक्यातील लाखलगाव व गिरणारे येथील द्राक्ष उत्पादकांचा माल यात प्रामुख्याने होता. वेळीच मालाची काढणी होण्यासह दुपटीने दर मिळाल्याने शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळात जय बाबाजी भक्त परिवाराने मोठा दिलासा दिला आहे.

असे होते उपक्रमाचे नियोजन:
-द्राक्ष उत्पादकांच्या थेट बागेतून ताजी द्राक्ष काढणी
-पॅकिंग झाल्यानंतर वाहनांद्वारे द्राक्ष पेट्यांची घरपोहोच सेवा…
-जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात गटनिहाय १०० रुपये प्रतीपेटीप्रमाणे वितरण
-मागणी, पुरवठा, जमा रकमांच्या दैनंदिन नोंदी
-यंत्रणेमार्फत जमा झालेले पैसे पेट्यांनुसार पुन्हा शेतकऱ्यांना तात्काळ अदा.

अशी झाली उलाढाल
द्राक्ष पेटीचे वजन : ५ किलो
एकूण पेट्यांचे वितरण : ६० हजार नग
एकूण द्राक्षमाल पुरवठा : ३०० टन
पेटीची किंमत : १०० रुपये
झालेली उलाढाल : ६० लाख

द्राक्ष हे हंगामी फळ असून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे. मात्र चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे अवघड झाले. त्यांना पुढील हंगामात उभे राहण्यासाठी निधीची उपलब्धता व्हावा यासाठी हा उपक्रम राबवला. ‘शेतकरी जगला तर देश जगेल, कृषिसेवा हे आश्रमाचे तत्व आहे. त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून काम हाती घेतले.
-श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज

- Advertisment -

ताज्या बातम्या