आता अंत्यविधीला जाणे झाले धोकादायक; जिल्ह्यात २७ जणांना बाधा झाल्याचे उघड
स्थानिक बातम्या

आता अंत्यविधीला जाणे झाले धोकादायक; जिल्ह्यात २७ जणांना बाधा झाल्याचे उघड

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : आता करोनाग्रस्तांच्या अंत्यविधीला जाणे धोकादायक होत चालले असून आतापर्यंत शहरात २७ जणांना अंत्यविधीला गेल्यानंतर करोनाची लागण झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

दरम्यान करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतांना आता करोना बाधित रुग्णांच्या मृत्युनंतर नातेवाईक अत्यंविधी करण्यासाठी पुढे येत नसल्याचे धक्कादायक वास्तव मुंबईत समोर आले आहे. यामुळेच आरोग्य विभाग व पोलीसांनाच अंत्यविधी उरकावा लागत आहे. असे असले तरी संशयितांचा स्वॅब अहवाल होण्यास विलंब होत असल्याने अंत्यविधीला जाणे धोकादायक ठरत असल्याचे जिल्ह्यात काही घटनांतून समोर आले आहे. नातेवाईक व आप्तेष्टांच्या अंत्ययात्रेला गेल्यामुळे २७ जणांना करोना झाल्याचे समोर आले आहे.

नाशिक शहरातील सातपूर कॉलनी भागातील एक ६० वर्षीय महिला नातेवाईकासह मालेगांव तालुक्यातील नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी गेली होती. ती घरी परतल्यानंतर तिला त्रास जाणवू लागल्याने २ मे रोजी तिला करोना झाल्याचे समोर आले. याच महिलेच्या संपर्कात आलेल्या आणखी ०७ जणांना करोना झाल्याचे समोर आले होते.

त्यांनतर सातपूर – अंबड लिंकरोड भागातील संजीवनगर शिवारात असलेल्या प्रभात वसाहतीतील एक वृध्द नातेवाईकांच्या अंत्ययात्रेसाठी मुंबईला २ मे रोजी जाऊन ५ मे रोजी नाशिकला परतला. १९ मे रोजी त्यांना त्रास झाल्यावर काही तासांतच त्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला, मात्र त्यांचा अहवाल दुसर्‍या दिवशी आला.

तोपर्यत १९ मे रोजी त्यांच्यावरील अंत्यविधीला नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातील या वृध्दांच्या घरातील २ जणांना आणि नंतर ११ जणांना करोना झाल्याचे समोर आले आहे.

तसेच देवळा येथील एक अंत्ययात्रेला मुंबई व नाशिक येथून नागरिक गेले होते. येथून परतल्यानंतर एका एका महिलेला त्रास झाल्यानंतर तिचा खाजगी रुग्णालयात मृत्यु झाला होता. या महिलेच्या संपर्कातील ५ जणांना शहरातील डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर यातील ४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे.

तसेच मुंंबईत वास्तव्यास असलेले एक वृध्द हृदयाचा त्रास झाल्याने नाशिक येथे आल्यानंतर त्यांना मुलाने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. नंतर हा वृध्द मृत झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. मृताचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील ३ जणांना कोरंटाईन करण्यात आले होते. यातील २ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

अशाप्रकारे शहर व जिल्ह्यातील अत्यंविधीला गेलेल्या अनेकांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता अंत्यविधीला जाणे देखील धोकादायक बनले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com