वाढदिवसाचे अकरा हजार दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी; जिल्हाधिकाऱ्यांनी केले चैतन्यचे कौतुक

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक : कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या सर्वत्र शांतता असते. इमर्जंन्सी ऑपरेशन सेंटर मध्ये कार्यरत अधिकारी वगळता सध्या कुणाचाही वावर इथे नसतो. परंतु काल (७ एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी सुरज मांढरे आपल्या सहकाऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चर्चा करत असताना अचानक एका लहानग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हातात धनादेश सोबत त्याची लहान बहिण, दोघांच्याही तोंडावर मास्क, दोघेही चालत चालत थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळ येऊन पोहोचले. अन् आपल्या हातातील धनादेश त्या लहानग्याने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हातात दिला.

श्री. मांढरे यांनीही तो अत्यंत कुतूहलाने स्वीकारला. नंतर हळूच या लहानग्याने सांगितले, ‘सर मी चैतन्य वैभव देवरे ही माझी बहिण तेजस्वी वैभव देवरे. आज माझा वाढदिवस आहे, परंतु कोरोनामुळे तो मला साजरा करायचा नाही. वाढदिवसासाठी मी आणि माझ्या बहिणीने साचवलेले खाऊचे पैसे रू ११ हजार १११ मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देवू इच्छितो. आपण त्याचा स्वीकार केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी सध्या बाहेर पडत नाही; घरातच असतो, आज फक्त हे खाऊचे पैसे आपल्याला देण्यासाठी येथे आलोय. मी पुन्हा घरी थांबणार आहे!’

तेजस्वीने दिलेल्या या भावनिक प्रतिसादाने क्षणभर जिल्हाधिकारी श्री. मांढरे व उपस्थित सर्व अधिकारी भारावून गेले. जिल्हाधिकाऱ्यांनीही वैभवने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेला धनादेश आवर्जुन स्वीकारत त्याचे आभार मानले, तसेच त्याला दीर्घायुष्य, दीर्घ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर लॉकडाउन संपल्याशिवाय बाहेर पडायचं नाही, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या मित्रांनाही आपापल्या घरातच रहायला सांग, असे भावनिक आवाहन केले.

चैतन्य ने कोरोना व लॉकडाउनच्या कालखंडात केलेल्या या आगळ्या-वेगळ्या वाढदिवसाने उपस्थित सगळ्यांनीच त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, नितीन मुंडावरे, वासंती माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, आपत्ती नियंत्रण अधिकारी प्रशांत वाघमारे हे उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *