लासलगाव : वडिलांच्या अंत्यविधीपूर्वी ‘ति’ने दिला १० वीचा पेपर

लासलगाव : वडिलांच्या अंत्यविधीपूर्वी ‘ति’ने दिला १० वीचा पेपर

लासलगाव : गुरुवारी (दि.०५) मध्यरात्री २ वाजता जन्मदात्या वडिलांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. अन दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.०६) रोजी परिस्थितीला मोठ्या ध्यैर्याने तोंड देत वडिलांच्या अंत्यविधीपूर्वी एका मुलीने लासलगाव येथील जिजामाता कन्या विद्यालयात दहावीचा पेपर दिला.

तिचे नाव आहे नंदिनी वाघ! बाबा मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनून तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करील, नका ना सोडून जावू आम्हाला… अशी आर्त हाक तिने बाबांना मारली अन् टाहो फोडल्याने अंत्यविधीसाठी उपस्थित जनसमुदायाला अश्रूंचा बांध आवरणे अवघड झाले. हृदयाला हेलावून टाकणारी ही घटना लासलगाव येथील सर्वे नं.93 येथे घडली.

शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजता रमेश वाघ यांचे निधन झाल्याने लाडकी कन्या नंदिनीला जबरदस्त धक्का बसला. याच दिवशी तिचा 10 वीचा पेपर होता. परिणामी वडिलांचा अंत्यविधी आटोपण्याच्याआत थेट परीक्षा केंद्रावर ती दहावीचा पेपर देण्यास गेली.

डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, शंतनू पाटील, प्राचार्य बाबासाहेब गोसावी, मुख्याध्यापिका सुधा आहेर, पर्यवेक्षिका संजीवनी पाटील, रोशनी गायकवाड, निफाड पं. स. सदस्या रंजना पाटील व संस्थेच्या संचालिका निता पाटील यांनी नंदिनीला परिस्थितीची जाणीव करुन देत दहावीचे पेपर देण्यास प्रोत्साहित केले.

यावेळी नातेवाईक, सगेसोयरे व शिक्षकांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला. नंदिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तिला बहीण व दोन भावंडे आहेत. अखेर वडिलांच्या निधनामुळे कुटुंब उघड्यावर आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com