नागपुरात मध्य भारतातील पहिले कोविड हॉस्पिटल रुग्णांसाठी सज्ज

नागपुरात मध्य भारतातील पहिले कोविड हॉस्पिटल रुग्णांसाठी सज्ज

नागपुर : दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून कोरेना संसर्गाला समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. याच प्रयत्नांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘मेडिकल’ ने पुढाकार घेतला असून तिथे असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला २२० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. रविवार २६ एप्रिल पासून हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेत सुरू झाले आहे.

ट्रॉमा केअर सेंटरला कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यासाठी मेडिकल चे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, ट्रॉमा केअर सेंटरचे इन्चार्ज प्रवीण पटनाईक, नोडल अधिकारी मोहम्मद फैजल ,बधीरीकरण विभागाचे प्रमुख नरेश तिरपुडे,औषधी वैद्यकशास्त्र प्रमुख राजेश गोसावी यांनी अहोरात्र परिश्रम घेत केवळ १० दिवसात केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडत हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेत रुजू करण्यात आले.

विशेष म्हणजे या कोविड रुग्णालयात ६० खाटांच्या आयसीयू सोबत स्वतंत्र क्ष-किरण विभाग ,स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र रक्तसाठा केंद्र असणार आहे. मध्य भारतातील सर्व सोयींनी युक्त असे हे अत्याधुनिक पहिले कोविड रुग्णालय ठरले आहे.

या रुग्णालयात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रुग्णांवरील उपचाराला ३ भागात विभागण्यात आले असून यात कोरोना लक्षणे नसलेल्यांसाठी कोविड केअर सेंटर, सामान्य लक्षणे असलेल्यांसाठी कोविड हेल्थ सेंटर तर गंभीर रुग्णांसाठी विशेष केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोविड हॉस्पिटलमधून कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून रुग्णांसाठी आणि डॉक्टरांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात आला आहे.

वॉर्डात रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी काचेचा विशेष कक्ष तयार करण्यात आल्याचे मेडिकल चे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांनी सांगितले आहे. डायलिसिस वर असलेल्या रुग्णामध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याच्या सोयीसाठी ३ डायलिसीस यंत्र उपलब्ध करून देण्यात आल्याचेही डॉ.सजल मित्रा यांनी सांगितले आहे.

कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी स्थानिक स्तरावर पालकमंत्री नितीन राऊत, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे मेडिकल चे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com