उत्तरप्रदेशातील ‘ते’ 16 विद्यार्थी जिल्ह्यात परतणार
स्थानिक बातम्या

उत्तरप्रदेशातील ‘ते’ 16 विद्यार्थी जिल्ह्यात परतणार

Sarvmat Digital

जिल्हा प्रशासनाने दिले उत्तर प्रदेशाच्या प्रशासनाला पत्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- अभ्यास करण्यासाठी गेलेल्या नगर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 16 विद्यार्थी उत्तर प्रदेशमधील उन्नावच्या नवोदय विद्यालयात अडकले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आला असला, तरी जिल्हा प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांना नगरमध्ये आणण्यासाठी पत्र देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या गृहखात्याकडून देण्यात आली.

उत्तर प्रदेशातील 23 विद्यार्थीही पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात अडकले आहेत. नगरला अडकलेले 23 विद्यार्थी उन्नावला सोडून तेथील 16 विद्यार्थी नगरला आणण्याबाबत नवोदय विद्यालयाने जिल्हाधिकार्‍यांना पत्राद्वारे कळविले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ दखल घेत, नगरमधील विद्यार्थ्यांना आणण्याच्या हालचाली केल्या आहे.

उत्तर प्रदेशात अडकलेल्या नगरच्या विद्यार्थ्यांमध्ये आठ मुली व आठ मुलांचा समावेश आहे, तर नगरमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशाच्या विद्यार्थ्यांमध्ये पंधरा मुले व आठ मुलींचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून अभ्यास करण्यासाठी गेले होते. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर परतण्याची वेळ आली, त्या वेळी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे.

जाण्या-येण्याचे सर्व मार्ग खुंटल्याने विद्यालयाने पत्राद्वारे जिल्हाधिकार्‍यांना कळविले आहे. दरम्यान, अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या गृहखात्याकडून पत्र देण्यात आले असून या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्रीरामपूरचा तो विद्यार्थी अडकला
श्रीरामपूर तालुक्यातील बागूल नावाचा एक विद्यार्थी राजस्थानमध्ये अडकलेला आहे. हा विद्यार्थी त्या ठिकाणी आयटीचे शिक्षण घेत असून त्याला परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाल होतांना दिसत नाही. यामुळे संबंधीत विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये नाराजी आहे.

Deshdoot
www.deshdoot.com