भंगाराच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये इतर दुकानेही भस्मसात

अहमदनगर (प्रतिनिधी)- कायनेटिक चौक परिसरातील एका भंगार विक्रीच्या दुकानाला गुरुवारी सायंकाळी आग लाागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे त्याच्या शेजारील सहा ते सात दुकाने, टपर्‍या आगीमध्ये भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.

सायंकाळी साडेसातच्या सुमाराला ही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केलेे. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न रात्री उशीरापर्यंत सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकासह फायर फायटर शंकर मिसाळ, व्हीआरडीईचे पथक प्रयत्न करत होते. पोलिस नाईक राजू जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

भंगार विक्रीच्या दुकानाशेजारी असलेली इतर दुकानांमध्येही ही आग पसरली. यामध्ये हॉटेल, टपर्‍या, पंक्चर काढण्याची दुकाने, अ‍ॅटोमोबाईलचे दुकान, मोबाईल दुरूस्तीचे दुकान आदींचा समावेश होता. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हॉटेलमध्ये गॅस सिलींडर असल्याने चिंतेत भर पडली होती.