ना. शंकरराव गडाखांची मोटारसायकल स्वारी संकटग्रस्तांच्या दारी !

jalgaon-digital
2 Min Read

सोनई (वार्ताहर) – ना. शंकरराव गडाख यांनी सोनई येथील खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला दुचाकीवरुन भेट दिली. कोरोना व्हायरसची माहिती देत घ्यावयाची प्रतिबंधात्मक काळजी लोकांच्या अडचणी सोशल डिस्टन्स ठेवून समजावून घेतल्या. संकटावर मात करु. मी आपल्या सर्वांसोबत आहे असा आश्वासक धीर दिला. या साधेपणाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

सोनई येथील संतोष क्षीरसागर यांच्या मोटारसायकलवर बसून जलसंधारण मंत्री गडाख यांनी खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला भेट देवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कुटुंबांची अडचण जाणून घेतली. बंदमुळे उपासमार सुरु असल्याचे डबरी वस्तीवरील ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर मंत्री गडाख यांनी तातडीने भोजनाची व्यवस्था होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे व्यवस्थाही करण्यात आली.

मंत्री म्हटलं की नेहमी मागे पुढे पोलीस वाहनांची गर्दी, सायरनचा भला मोठा आवाज, संबंधित खात्याचे अधिकार्‍यांची रेलचेल आणि अर्थातच वजनदार कार्यकर्त्यांचा लवाजमा ठरलेला असतो. मात्र या सर्वांना फाटा देत मंत्री गडाखांनी अतिशय साध्या पध्दतीने वस्तीतील गोरगरिबांच्या दारात जावून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

मागील आठवड्यात गडाखांनी स्वत:चा बंदोबस्त नाकारुन हा बंदोबस्त कोरोना प्रतिबंधासाठी वापरावा, असा अगळा निर्णय घेतला होता. ग्रामस्थ नामदेव सावंत म्हणाले, गडाख साहेबांनी भेट दिल्याने मोठा धीर आला. त्यांना आमच्या रेशनकार्ड, रस्ता, पाण्याची समस्या सांगितली आहे. त्यांनी हे प्रश्न लवकर मार्गी लागतील असे सांगितले.

ना. शंकरराव गडाख म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय कौशल्याने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत. या संकटाचा सामना करताना सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. घरी थांबूनच गर्दी टाळून आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो. अडचणी आणि समस्या सर्वांचीच झाली आहे. सरकार सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. घरात रहा, सुरक्षीत रहा, असे आवाहन केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *