कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळ

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळ

मुंबई : कोवीड-१९ या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यात सध्या काय स्थिती आहे, कोवीड १९ अर्थात कोरोना विषाणूविषयीची खरी माहिती, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी राज्य शासन करत असलेली कार्यवाही, कोरोना आजारापासून मुक्ती मिळालेल्यांची माहिती, लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांसाठी कुठे-कुठे कॅम्प उभारले आहेत.

वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना या सर्वाची एकत्रित, अधिकृत व खात्रीशीर माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने https://www.mahainfocorona.in/ या संकेतस्थळाची (वेबसाईट)ची निर्मिती केली आहे. हे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले झाले आहे.

जगभरासह देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्रबरोबरच राज्य शासन विविध उपाय योजत आहे. त्याचबरोबर कोरोना बाधितांची योग्य ती काळजी घेऊन रुग्णांना बरे करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा अविरत झटत आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्री आपआपल्या विभागामार्फत राज्यातील जनतेची काळजी घेत आहेत.

या सर्वाची माहिती प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योग्य रितीने पोहचणे आवश्यक आहे. समाजमाध्यमाद्वारे अनेकवेळेस चुकीची माहिती पसरली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. कोवीड१९ अर्थात कोरोना विषाणूची माहिती, राज्य शासन करत असलेल्या प्रयत्त्नांची खात्रीशीर माहिती वेळोवेळी तत्काळ मिळावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

वेळोवेळी माहिती होणार अपडेट

या संकेतस्थळावर कोवीड १९ ची सर्वसाधारण माहिती दिली आहे. ज्यामध्ये हा रोग कसा होतो, कोरोना संसर्गापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय रोजच्या रोजची आकडेवारी इन्फोग्राफीकसह माहिती दिली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कॉल सेंटर व राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाचे क्रमांकही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हानिहाय हेल्पलाईनचे क्रमांकही या ठिकाणी देण्यात आले आहेत.

तसेच सार्वजनिक सुविधा या विभागात प्रत्येक जिल्ह्यात कोणकोणत्या सोईसुविधा केल्या आहेत, त्याची जिल्हानिहाय सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

घडामोडी या सदरात राज्य शासनाचे विविध विभागांनी घेतलेले निर्णय, जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, मुख्यमंत्री, इतर मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदांचे व बैठकांची माहिती, राज्यात घडणाऱ्या ठळक घडामोडी आदींची माहिती देण्यात आली आहे. माध्यमांपर्यंत लवकरात लवकर माहिती मिळावी, यासाठी हे सदर वेळोवेळी अद्ययावत होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ट्विटर आणि फेसबुकवर देण्यात येणाऱ्या माहितीची लिंकही येथे देण्यात आली आहे. तसेच ही माहिती येथून डाऊनलोडही करता येणार आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी-कोवीड १९ च्या खात्याची माहितीही देण्यात आली असून या खात्याची क्यूआर कोडही येथे देण्यात आली. जेणेकरून इच्छुकांना थेट मदत देता येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com