प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.

समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईमला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी एकत्रितपणे या विषाणूचा मुकाबला करुया, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत केले.

यासंदर्भात विधानपरिषदेत सदस्य प्रकाश गजभिये यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, राज्यशासनाने या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी परिपूर्ण तयारी केली आहे. आतापर्यंत मुंबईत आलेल्या 551 आंतरराष्ट्रीय विमानातील 65 हजार 121 प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले आहे.

राज्यात बाधित देशातून 401 प्रवाशी आले असून आतापर्यंत 152 प्रवाशांना विविध रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची दोन वेळेस प्रयोगशाळा चाचणी केली. त्यापैकी 149 लोकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी 143 जणांना घरी सोडले आहे. सध्या सहा जण दाखल असून पुणे येथे दोन जण नायडू आणि मंगेशकर रुग्णालयात निरिक्षणाखाली आहेत. मुंबई येथे चार जण कस्तुरबा आणि हिंदुजा रुग्णालयात दाखल आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com