यंदा पाऊले नाही चालणार पंढरीची वाट; वारकरी संप्रदाय व राज्य शासनाच्या बैठकीत निर्णय
स्थानिक बातम्या

यंदा पाऊले नाही चालणार पंढरीची वाट; वारकरी संप्रदाय व राज्य शासनाच्या बैठकीत निर्णय

Gokul Pawar

Gokul Pawar

पुणे : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी जाणारा पायी दिंडी सोहळा होणार यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरवले जाईल. देहु आणि आळंदीहुन पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाल्याने यंदा पायी दिंडी सोहळा होणार नाही.

वारकरी सांप्रदायातील प्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. यावेळी आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी. किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची? आळंदी आणि देहुहुन पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या? याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भुमिका मांडल्या. यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भुमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली.

यंदाची आषाढी यात्रा ‘या’ पद्धतीने होण्याची शक्यता

यापूर्वीच आषाढी वारीसाठी राज्यातील सात मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी एकनाथ महाराज पैठण, निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव आणि सोपान काका सासवड यांनी यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितलं की, प्रस्थानाच्या दिवशी शासनाच्या नियमात राहून प्रस्थान होईल आणि दशमीपर्यंत पालखी सोहळा त्याच गावी मुक्काम राहील. पैठणमध्ये नाथच्या जुन्यावाड्यातून दिंडी समाधी मंदिरापर्यंत येईल. दशमीपर्यंत तिथेच मुक्कामी राहील. दशमीला ३० मानकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी. हा सगळा प्रवास मानाच्या पादुकांसह वेगवेगळ्या वाहनांनी करण्यात येईल.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या आणि दिवसेंदिवस बिघडत चाललेली परिस्थिती याचा विचार करण्यात आला, तसेच पंढरपूर शहरातही कोरोना संसर्गाची लागण टाळण्याच्या दृष्टीने गांभीर्याने मुद्दे मांडले गेले, तसेच वारीची परंपरा कायम राहावे असाही प्रयत्न मंत्रिमहोदयांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी वारी परंपरेत वाखरी येथे दरवर्षी संतांचे पालख्या एकत्र येतात ही परंपरा कायम ठेवली जाणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यकता पडल्यास बस, हेलिकॉप्टर, विमान अशा साधनांचा वापर करून पादुका वाखरीत पोहोचवल्या जातील दशमीच्या दिवशी या पालख्या वाखारीत पोहोचतील. आषाढी एकादशीच्या कालावधीत कोरोना संसर्गाची परिस्थिती कशी असेल यावर उर्वरित नियोजन केले जाईल.

वारी परंपरा खंडित होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. मात्र पायी वारी करण्याच्या अडचणी खूप असणार आहेत अनेक वारकऱ्यांना जिल्हे ओलांडून पंढरी पोहोचणे अडचणीचे ठरणार आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.हे लक्षात घेऊन परंपरा टिकावी यावर सर्वांचे एकमत झाले आहे.
वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असणार आहे.
– उपमुख्यमंत्री , अजित पवार

आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे, वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व सबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचविण्यात येईल. विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्य सरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेतांना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही या संतांनी दिलेल्या शिकवणीचा आदर करुया, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीसाठी आपण सर्वांनी शासनाकडे सकारात्मक भूमिका मांडली व शासनाच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत केले ही कौतुकास्पद बाब आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामूळे गेल्या अडीच महिन्यापासून सर्व धर्मीयांनी आपले धार्मिक कार्यक्रम घरात राहुनच साजरे केले आहेत. हाच आदर्श समोर ठेवून या वर्षीचा आषाढी वारीचा कार्यक्रम गर्दी न करता शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करुन परंपरा कायम ठेवायची आहे. या सोहळ्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. याबाबतची सर्व ती खबरदारी राज्यशासन घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

दुरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन आषाढी वारीचा आनंद घेता येणार

राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगी शिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नसल्याचे सांगतानाच राज्यातील वारकरी संप्रदायाच्या सकारात्मक भुमिकेबद्दल त्यांनी आभार मानले. दुरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन आषाढी वारीचा आनंद घरबसल्या अनुभवता येणार आहे. वारकरी संप्रदाय व सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com