
मुंबई : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्य्युबेशन केंद्रामध्ये ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ तयार झाली आहे. येणाऱ्या दोन दिवसामध्ये आवश्यक त्या मान्यता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) प्राप्त होणार आहेत.
त्यानंतर कोरोना संसर्गजन्य द्रवाचे नमुने तपासणी सुरु करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये एकाचवेळी दोन तासात ३८४ नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची प्रयोगशाळा निर्मिती करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे पहिले ठरणार आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या समन्वयाने ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ निर्माण होत आहे.
इथे फक्त पूर्ण सुरक्षित कपड्यामध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिल्या जाणार आहे. या प्रयोगशाळेमुळे मराठवाडयातील आणि आजूबाजूच्या राज्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. कोरोना संशयितांच्या घशातील द्रवाची (स्वॅब) तपासणी लवकरात लवकर होईल. आणि कोरोणाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर तात्काळ औषोधोपचार करता येणार आहे.
विद्यापीठाच्या इंक्य्युबेशन केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे असलेली सुसज्य प्रयोगशाळा असल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्याशी चर्चा करून ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ सुरु करण्याकरिता केंद्र सरकारच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) सादर केला होता. पुढील दोन दिवसात याबाबतची मान्यता मिळणार आहे.