राज्यात मध्यरात्रीपासून १४४ कलम लागू; विमानसेवा, रेल्वे, बससेवा बंद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
स्थानिक बातम्या

राज्यात मध्यरात्रीपासून १४४ कलम लागू; विमानसेवा, रेल्वे, बससेवा बंद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : राज्यभरात कलम 144 लागू करण्यात आले असून पाच पेक्षा अधिक लोकं एकत्र जमू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना विलग ठेवा. घरात देखील वेगळे राहण्याची सूचना त्यांनी केली आहे.

दरम्यान देशभरात आज जनता कर्फ्यू असून यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घेतला आहे. परंतु यापुढे जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात १४४ लागू करण्याचे आदेश दिले आहेत. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याचबरोबर रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करण्यात येत असून बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार आहेत. तसेच अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील. बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील. तसेच बाहेरून येणारी विमाने आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत आहेत. ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत, त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा, अशी विनंती त्यांनी केली.

त्याचप्रमाणे चाचणी केंद्रामध्ये वाढ करणार असून अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com