मुंबईतील १४६ ठिकाणे सील; बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबईतील १४६ ठिकाणे सील;  बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने शहरातील आणि उपनगरातील एकूण १४६ परिसर सील केले आहेत. ज्या ठिकाणी करोनाचे रूग्ण सापडले आहेत किंवा ज्या ठिकाणी करोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊन करोनाची लागण झाली आहे, अशी ठिकाणे पालिकेच्यावतीने सील करण्यात आली आहे.

हे परिसर सील करताना इथल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरुच राहिल याची खबरदारी आम्ही घेतली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातला आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होऊ लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण ३२० कोरोना बाधीत आढळून आले आहेत. त्यापैंकी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५ जणाची कोरोनाच्या जाळ्यातून सुटका झाली असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

दक्षिण मुंबईतील ४८ परिसर सील करण्यात आले आहेत, यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे. वरळीत सोमवारी कोरोना विषाणूचे ८ रुग्ण आढळल्यानंतर तो परिसर सील करण्यात आला आहे. मंगळवारी वरळी कोळीवाडा परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही १० वर पोहोचली होती. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारीच हा परिसर सील करण्यात आला होता. हा मुंबईतील दाट लोकवस्तीचा परिसर आहे. जवळपास ८० हजार लोक इथे राहतात.

इथल्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणे शक्य नाही, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे या भागात आरोग्य जनजागृती मोहीम राबवली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इथे २४ तास वैद्यकीय सेवा सुरु ठेवली आहे तसेच बाहेर रुग्णवाहिका देखील उभी करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या दाट लोकवस्तीच्या भागात दररोज प्रत्येकाला अन्नधान्य आणि दूध पुरवणे ही खरी कसरत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com