हे कलाकार ठरले महाराष्ट्राचे फेवरेट; ‘खारी बिस्कीट’ सगळ्यात भारी
स्थानिक बातम्या

हे कलाकार ठरले महाराष्ट्राचे फेवरेट; ‘खारी बिस्कीट’ सगळ्यात भारी

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी जिथे जमते, तो ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा सोहळा नुकताच पार पडला आहे.

वैदेही परशुरामी, सिद्धार्थ जाधव, पल्लवी पाटील, शिवानी सुर्वे, मानसी नाईक अशा अनेकांनी नृत्य सादर करून आपली वेगळी छाप पाडली. वैभव तत्ववादी आणि अमेय वाघ यांचं खुमासदार सूत्रसंचालन या सोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. एकूणच हा सोहळा खूपच जबरदस्त ठरला आहे.

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या सोहळ्याची सगळ्यात मोठी खासियत, म्हणजे यातील विजेत्यांची निवड थेट प्रेक्षकांकडून केलेलं जाते. त्यामुळेच, यंदाच्या वर्षात सर्वांचा अत्यंत लाडका ठरलेला, ‘खारी बिस्कीट’ हा सिनेमा, सर्वाधिक पुरस्कार मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. चार पुरस्कार आपल्या नावावर करत, ‘खारी बिस्कीट’ने आपला निराळा ठसा उमटवला. संजय जाधव यांनी ‘फेवरेट दिग्दर्शक’ हा पुरस्कार मिळवला, तर अमितराज यांच्या ‘तुला जपणार आहे’ या गीताला फेवरेट गीत म्हणून निवडण्यात आलं. याच गीताचे गायक आदर्श शिंदे आणि रोंकिणी गुप्ता, हे फेवरेट सिंगर सुद्धा ठरले. या शर्यतीत ‘हिरकणी’ सुद्धा मागे पडली नाही. प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, प्रेक्षकांचा ‘फेवरेट चित्रपट’ ठरला. सोनाली कुलकर्णी हिने ‘फेवरेट अभिनेत्री’ म्हणून पुरस्कार मिळवला, तर सहाय्यक अभिनेता प्रसाद ओक सुद्धा सर्वांचा ‘फेवरेट’ ठरला.

२०१९चा ‘फेवरेट अभिनेता’ ठरण्याचा मान, हॅन्डसम कलाकार ललित प्रभाकर याला मिळाला.

महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९मधील विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे;

महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक: संजय जाधव
महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट: हिरकणी
महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता: ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)
महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री: सोनाली कुलकर्णी (हिरकणी)
महाराष्ट्राचा फेवरेट सहाय्यक अभिनेता: प्रसाद ओक (हिरकणी)
महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री: मृणाल कुलकर्णी (फत्तेशिकस्त)
महाराष्ट्राचा फेवरेट गायक: आदर्श शिंदे (खारी बिस्कीट)
महाराष्ट्राची फेवरेट गायिका: रोंकीणी गुप्ता (खारी बिस्कीट)
महाराष्ट्राचे फेवरेट गीत: अमितराज (खारी बिस्कीट)
महाराष्ट्राचा फेवरेट पॉप्युलर फेस: शिवानी सुर्वे
महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन: अंकुश चौधरी
गोल्डन दिवा अवॉर्ड: मृणाल ठाकूर

Deshdoot
www.deshdoot.com