कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाची सुनावणी; शरद पवार देणार साक्ष!

कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाची सुनावणी; शरद पवार देणार साक्ष!

मुंबई : ‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाने सुनावणीचे कामकाज पुढे ढकलले आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या सुनावण्या आता पुण्याऐवजी मुंबई येथील कार्यालयात दि. ३० मार्च ते ४ एप्रिल, 2020 या कालावधीत होणार आहेत. सुनावणीचे सुधारित वेळापत्रक आयोगाच्या पुणे तसेच मुंबई येथील कार्यालयात लावण्यात येईल. अत्यावश्यक कारणाशिवाय आयोगाच्या कार्यालयास भेट देऊ नये, असे आवाहनही आयोगाच्या सचिवांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ४ एप्रिल रोजी संध्याकाळी चौकशी आयोगा समोर साक्ष होणार आहे, अशी माहीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

मलिक म्हणाले, कोरेगांव येथील दंगल सुनियोजित होती अशी आमच्या पक्षाची पहिल्यापासून भूमिका आहे. त्यामुळे यापूर्वीच पवार यांनी आपल्या लेखी प्रतिज्ञा पत्राच्या माध्यमातून म्हणणे दिले आहे. शिवाय चौकशी आयोगाने त्यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यानुसार येत्या ४ एप्रिलला ते आयोगासमोर साक्ष देणार आहेत. मागील मुख्यमंत्र्यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले होते, परंतु त्यांनी चौकशी आयोगाला सहकार्य केलेले नाही. लेखी प्रतिज्ञा पत्राच्या माध्यमातून तसे कळवलेही नाही, असा आरोपही मलिक यांनी केला.

चौकशी आयोगाकडून जे काही सत्य समोर येईल ते जनतेला कळेल. राज्य चौकशी आयोगाची मुदत ८ तारखेला संपणार असली तरी इतर आयोगाप्रमाणे त्यालाही सरकारकडून मुदतवाढ दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com