शिवभोजन थाळीस आधारकार्डची आवश्यकता नाही – छगन भुजबळ
स्थानिक बातम्या

शिवभोजन थाळीस आधारकार्डची आवश्यकता नाही – छगन भुजबळ

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : येत्या २६ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या शिवभोजन थाळीस आधारकार्डची आवश्यकता नसल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ‘शिवभोजन’ योजना ही गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान राज्यभरात येत्या प्रजासत्ताक दिनापासून १० रुपयात शिवभोजन थाळीचा शुभारंभ होणार आहे. या थाळीचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु आता नामदार छगन भुजबळ यांनी आधारकार्ड सक्तीचे नसल्याचे सांगितले आहे.

भुजबळ म्हणाले, या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी व महानगरपालिका क्षेत्रात किमान १ भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. ही भोजनालये दुपारी १२ ते २ या कालावधीत कार्यरत राहतील. या भोजनालयात दुपारी १२ ते २ या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची आहे.

यासाठी भोजनालय चालविण्यासाठी या मालकाकडे स्वत:ची पर्याप्त जागा असावी. भोजनालयात एका वेळी किमान २५ व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल. एका भोजनालयात किमान ७५ आणि कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध होणार आहे. या भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना या भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असल्याचेही श्री.भुजबळ यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com