Friday, April 26, 2024
Homeनगरतुम्ही घरी थांबा, आम्ही अखंडीत वीजपुरवठा करू !

तुम्ही घरी थांबा, आम्ही अखंडीत वीजपुरवठा करू !

आपत्तीतही महावितरण ग्राहकांसाठी सज्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आला असताना या काळातही महावितरणची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. आरोग्याची योग्य खबरदारी घेऊन अभियंता व कर्मचारी यांनी अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य देत कर्तव्य बजावण्याचे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदीचा आदेश तसेच घरुनच काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे महावितरणकडून विविध उपाययोजनांसह वीजपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवेसाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यालयांत पाच टक्के उपस्थितीची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी प्रामुख्याने अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी (जनमित्र, यंत्रचालक) सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज आहेत.

प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणार्‍या अभियंता व तांत्रिक कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता यांनी केले आहे. तसेच मास्क, लिक्विड हॅण्डवॉश, सॅनेटायझर याचा सातत्याने वापर करण्याचे सुचित करण्यात आले आहे. यासोबतच दुरुस्तीच्या कामासाठी जाताना अभियंता व जनमित्रांनी स्वतःचे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो तत्परतेने पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही गंभीर तांत्रिक बिघाडामुळे वेळ लागल्यास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणकडून सोमवारपासून (दि.23) वीजबिलांची छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत छपाई सुरु होईपर्यंत वीजग्राहकांना वीजबिल मिळणार नाहीत. तसेच वीजमीटरचे रिडींग सुद्धा घेण्यात येणार नाही. मात्र महावितरणच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल वीजबिल उपलब्ध आहेत. या सोबतच महावितरणकडे मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड केलेल्या वीजग्राहकांना एसएमएसद्वारे वीजबिलाची माहिती पाठविण्यात येणार आहे.

महावितरणच्या कन्झुमर पोर्टलवरून किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरचे रिडींग अपलोड करण्याची सोय आहे. मीटर रिडींग न घेतलेल्या वीजग्राहकांना सरासरी वीजबिल पाठविण्यात येणार आहे. त्यापुढील कालावधित वीज ग्राहकांना योग्य रिडींग घेतल्यानंतर अचूक वीजबिल देण्यात येईल. कोव्हीड-19 या विषाणूच्या संकट काळातही महावितरण अखंडित वीज पुरवठा करण्यास बांधिल आहे. या काळात वीज ग्राहकांनी मोबाईल अ‍ॅप तसेच महावितरणच्या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत वीजग्राहकांनी वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी किंवा अन्य सेवेसाठी शक्यतो महावितरणच्या कार्यालयात येऊ नये. किंबहुना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडूच नये. वीजपुरवठा खंडित झाला असल्यास किंवा अन्य महत्वाची तक्रार किंवा माहिती देण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर करण्यास सांगण्यात आले आहे.

नगरमध्ये मात्र वेगळा अनुभव
तुम्ही घरीच थांबा, आम्ही विजपुरवठा सुरळीत करू, असे जरी महावितरणकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात नगरमध्ये सावेडी भागात वेगळाच अनुभव आला. काल सायंकाळी वारे सुटल्यानंतर सावेडीच्या काही भागात वीज सतत ये-जा करत होती. याबाबत वारंवार महावितरण कार्यालयात फोन करूनही ‘नो रिप्लाय’ येत होता. दुसर्‍या दिवशीही दुपारनंतर याची दखल घेण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या