एक वेळ अजान देण्यास पोलिसांकडून परवानगी

एक वेळ अजान देण्यास पोलिसांकडून परवानगी

रमजान उपवासाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाचे मुस्लिम समाजाकडून स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी) –  करोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाऊन काळात शहरातील सर्व मशिदी बंद आहेत. मात्र रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास धरण्यासाठी व सोडण्यासाठी पहाटे आणि संध्याकाळी दोन वेळच्या अजानला मुभा मिळण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येत होती. या मागणीला प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलाने शहरातील 23 मशिदीमध्ये उपवास सोडण्याच्या वेळेस संध्याकाळी मगरिबच्या एका वेळेस आजान देण्याची परवानगी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या आदेशान्वये दिली आहे.

रमजान महिना सुरू होण्यापूर्वीपासून या संदर्भात मागणी करण्यात येत होती. रमजान महिना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीतही हा विषय उपस्थित करण्यात आला होता. सततच्या पाठपुराव्यानंतर एकवेळ आजानसाठी परवानगी मिळाल्याने मुस्लिम समाजात समाधानाचे वातावरण आहे. मंगळवारी (दि. 28) एप्रिल रोजी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बैठक झाली.

पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हारून मुलानी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुस्लिम समाजाचे हाजी मन्सूर शेख, हाजी करीम हुंडेकरी, उबेद शेख, हाजी शौकत यांनी आजानचा विषय पोलीस प्रशासनासमोर स्पष्ट करुन, मशिदीत सामुदायिक नमाज होणार नसल्याची भूमिका मांडली. बैठकीत पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये शहरातील मुस्लिम बहुल भागातील 23 मशिदीमध्ये आजान देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यामध्ये बक्कर कसाब मस्जिद (शनि चौक), पटवेकर मस्जिद (जूनाबजार), यतिमखाना मस्जिद (जुनी मनपा चौक), सुन्नी कुरेशी मस्जिद (बेपारी मोहल्ला), कारी मस्जिद (बाबा बंगाली झेंडीगेट), जलाली मस्जिद (कामाठीपूरा ईदगाह मैदान), सैदू कारंजा मस्जिद (झेंडीगेट), बारामासी मस्जिद (हातमपूरा), मोहंमदी मस्जिद (तांबटकर गल्ली), लालमिस्त्री मस्जिद (बेलदार गल्ली), शमशेर बाजार मस्जिद (सर्जेपूरा), हुसेनी मस्जिद (कोठला), तांबोली कब्रस्तान मस्जिद (रामवाडी), कवीजंग नगर मस्जिद (कवीजंग नगर), नुरानी मस्जिद (बोल्हेगाव), नुरानी मस्जिद (अप्पू हत्ती चौक लालटाकी), बडी मस्जिद, आयेशा मस्जिद, छोटी मरियम मस्जिद, बडी मरियम मस्जिद, दर्गा दायरा मस्जिद (मुकुंदनगर), मोमीनपूरा मस्जिद (भिंगार), आलमगीर मदरसा (आलमगीर) या मशिदीचा समावेश आहे. या मशिदी व्यतिरिक्त कोणत्याही मशिदीमधून अजान न देण्याचे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे. पोलीस प्रशासनाने सहकार्य करुन एक वेळच्या अजानची दिलेल्या परवानगीचे मुस्लिमांनी स्वागत केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com