नगरची बाजार समिती 31 मार्चपर्यंत बंद
स्थानिक बातम्या

नगरची बाजार समिती 31 मार्चपर्यंत बंद

Sarvmat Digital

नगर शहरातील किरकोळ भाजीबाजार राहणार बंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरच्या माजी खासदार दादा पाटील शेळके नगर बाजार समिती मधील भाजीपाला विक्री 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के व सचिव अभय भिसे यांनी दिली.

दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग संपविण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात केलेल्या तयारीवर मंगळवारी सकाळी दोन हजारांहून अधिक नागरिकांनी गर्दी केली. प्रशासन नागरिकांना गर्दी करू नका असे वारवांर सांगत असताना सुद्धा नागरिक याचे गांभीर्याने घेत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकर्‍यांनी भाजीपाला बाजार समिती मध्ये 31 मार्चपर्यत विकण्यास आणू नये असे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.

यासह नगर शहरातील चितळे रोड, गाडगीळ पटांगण, गंजबाजारातील भाजीपाला विक्रीवरही निर्बंध आणण्यात आले आहे. हे सगळे बाजार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी दिले असून त्यावर महापालिका आयुक्त हे अंमलबजावणी करणार आहेत. मंगळवारी सकाळी बाजार समितीच्या भाजीपाला बाजारातील गर्दी पाहून जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बाजार समितीचे सचिव आणि महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली. या बैठकीत गर्दीवर नियंत्रण आणण्याचा कोणताच मार्ग सापडला नाही. त्यामुळे बाजारच बंद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

गर्दी करू नका असे सांगणारे प्रशासन नगरकरांसमोर हतबल झाले असून आता दंडुक्याची भाषा सुरू केली आहे. इटली, चीनसारखी परिस्थिती उद्भवण्यास वेळ लागणार नाही असे मत व्यक्त करतानाच अजूनही वेळ गेलेली नाही. शासनाने लावलेल्या निर्बंध भावनेकडे सहकार्याने पहा अशी साद आता सुज्ञ नगरकर लागले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सगळीकडे अख्ख राज्यचं लॉकडाऊन झालयं. नगरही त्याला अपवाद नाही. रस्त्यावर येण्यासही आता मनाई करण्यात आली आहे. असे लॉकडाऊन असतानाही हजारावर नगरकर मार्केट यार्डात भाजीवर तुटून पडले असल्याचे दिसले.

हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांना ही बाब काही हमालांनी सांगितली. घुले यांनी लगेचच जिल्हाधिकारी द्विवेदी यांना फोन करून माहिती दिली. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी पोलीस प्रशासनाला आदेश करत बाजार उठविण्याचे सांगितले. काही वेळेतच पोलीस मार्केट यार्डात पोहचले. पोलिसांना पाहताच खरेदी करणारे अन् विक्री करणार्‍यांचीही पळापळ झाली. पोलिसांनी मग आपल्या स्टाईलने बाजार उठविला. शहरातील भाजी मार्केटमधील गर्दीचे फोटो सगळीकडेच व्हायरल झाले आहेत.

तेथील गर्दी पाहता कोरोनाची भयंकर परिस्थिती नगरात निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. लोक स्वत:च स्वत:ची काळजी घेण्यास तयार नसल्याचे यातून दिसते. आता प्रशासानेच कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. अन्यथा चीन, इटलीसारखी परिस्थिती उद्भवण्यास वेळ लागणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रशासनाने घातलेले निर्बंधाकडे सहकार्याच्या भावनाने पहा, त्याचे पालन करा अन् घरातच बसा अशी साद आता सुज्ञ नगरकर घालू लागले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com