Thursday, April 25, 2024
Homeनगरमाळी बाभूळगावला बनावट दारूच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा

माळी बाभूळगावला बनावट दारूच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असतानाही दारुची विक्री करणार्‍या माळी बाभूळगाव (ता. पाथर्डी) शिवारात समर्थनगर परिसरात प्रशांत हॉटेलच्या पाठीमागे देशी-विदेशी दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने धाड टाकली.
यामध्ये सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विजय बाबुराव आव्हाड (रा. जांभळी ता. पाथर्डी) याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सांयकाळी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. माळी बाभूळगाव शिवारात समर्थनगर परिसरात प्रशांत हाँटेलच्या पाठीमागे बंगल्यात देशी-विदेशी बनावटी दारूचा कारखाना चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह शाखेच्या कर्मचार्‍यांनी बुधवारी दुपारी धाड टाकली. घटनास्थळी बनावट देशी दारूच्या बाटल्या, बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या, बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारे तीन-चार मोठे मशीन, विविध दारू कंपन्यांचे नाव असलेले सीलबंद करण्याचे मशीन, झाकण, शेकडो रिकाम्या बाटल्या, हजारो पॉलिकॅप, देशी-विदेशी दारूचे रिकामे बॉक्स पथकाने जप्त केले. कारखान्याचा मालक जांभळीचे माजी सरपंच विजय आव्हाड याच्यावर विविध कलमान्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
- Advertisment -

ताज्या बातम्या