Saturday, April 27, 2024
Homeनगरओय काप्पे…. पतंगबाजीची शहरात धूम

ओय काप्पे…. पतंगबाजीची शहरात धूम

अहमदनगर (प्रतिनिधी)-  आकाशी एकमेकांची स्पर्धा करणारे रंगीबेरंगी पतंग, मोकळी मैदाने, विविध इमारतींच्या गच्चींवर कर्णकर्कश आवाजात सुरू असलेली गाणी, तेवढाच पतंग उडविणार्‍यांचा गलका आणि उत्साह अन् याबरोबरच लाभलेली तीळ-गुळाची गोडी. अशा भारावलेल्या वातावरणात मकर संक्रांतीचा सण बुधवारी (दि. 15) नगरमध्ये उत्साहात साजरा झाला.

अबाल वृद्धांनी एकमेकांना तिळगूळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध भागातील मंदिरांत दर्शनासाठी रांगा होत्या. महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून वाणाची देवाण-घेवाण केली. बाजारातही तिळगुळाबरोबर वाणाच्या साहित्याची व पतंग विक्रीची दुकाने थाटली होती. बोर-तिळाचे लाडू, सुगडे पूजन करून संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. हळदी-कुंकूसह विविध वाण खरेदीसाठी सकाळपासून बाजारपेठेत गर्दी होती.

- Advertisement -

शहरात सावेडी, गुलमोहररोड, बालिकाश्रमरोड, भिंगार परिसरातील अलमगीर, नागरदेवळे, माळीवाडा, चितळेरोड, केडगाव, स्टेशनरोड, आगरकरमळा, बुरूडगावरोड, एमआयडीसी परिसरातील बोल्हेगाव आदी भागांमध्ये सकाळपासून संध्याकाळी उशीरापर्यंत पतंग उडविण्याचा आनंद घेतला जात होता.

गोडव्यांच्या संदेशांना ऊत
‘तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला’, ‘आमचा तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका’, असे म्हणत नगरकरांनी उत्साहाने संक्रांतीचा सण साजरा केला. लहानांनी मोठ्यांचा चरणस्पर्श करीत आशीर्वाद घेतले. मित्रमंडळींनीही एकमेकांना तीळ-गूळ देत गळाभेटी घेतल्या आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहरातील अनेक संस्थांनी, महिला मंडळांनी उपक्रम घेत सामूहिक संक्रांत साजरी केली. एकूणच बुधवारी घरोघरी वर्दळ तर रस्त्यांवरील दुकानांवरही तरुणाईची गर्दी होती. घरोघरी महिलांनी हळदीकुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून एकमेकींना वाण दिले.

दिवसभर अनेकांवर संक्रांत
नायलॉन (चिनी) मांजावर बंदी असताना अनेकांनी दिवसभर पतंग उडविण्यासाठी त्याचा सर्रास वापर केला. यामुळे पशु-पक्षांसह नागरिकांवर संक्रांत ओढवत दिवसभर अनेक जण जखमी झाले. बंदी असलेल्या नायलॉन मांजाची अनेक दुकानात खुलेआम विक्री होत होती. या विरोधात महापालिकेने कारवाई केली नाही. दोन दिवसांपूर्वी शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने 14 दुकानदारांवर गुन्हे दाखल केले. तरीही मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर झाला. यामुळे दुचाकी व पायी जाणार्‍या नागरिकांना जायबंदी व्हावे लागले. मांजामुळे काहींना किरकोळ तर, काहींना गंभीर दुखापत झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या