महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा गौरव
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा गौरव

Sarvmat Digital

अकोलेकरांकडून 11 लाख रुपयांचा धनादेश प्रदान राहीबाई पोपेरेंचाही सत्कार

अकोले (प्रतिनिधी) –  अकोले तालुक्यातील कोंभाळणेचा सुपुत्र महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर याचा माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते काल अकोले येथील बसस्थानक परिसरात नागरी सत्कार पार पडला.हर्षवर्धन सदगीर याचा शाल, फेटा,ट्रॉफी व 11 लाख रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

हर्षवर्धन सोबत त्याचे वस्ताद काका पवार(पुणे) गोरक्षनाथ बलकवडे (भगूर) व सदगीर यांची आई ठकूबाई सदगीर,वडील मुकेश सदगीर,आजोबा किसन मास्तर सदगीर व कोंडाजी ढोन्नर यांचाही सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर सत्कार समिती,अकोले तालुका तालीम संघ व हनुमान व्यायाम शाळा यांच्यावतीने या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पदमश्री सन्मान जाहीर झालेल्या बीजमाता राहीबाई पोपेरे, अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर,माजी आमदार वैभवराव पिचड, अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, महाराष्ट्र केसरी गुलाबराव बर्डे, अशोक शिर्के, चंदन वस्ताद,पुणे येथील कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महादेव पठारे,नगरसेविका सोनाली लनाईकवाडी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी हर्षवर्धन सदगीर व राहीबाई पोपेरे यांनी अकोले तालुक्याचे नाव महाराष्ट्रात मोठे केले.महाराष्ट्रापेक्षा हरियाणा छोटे राज्य असतानाही तेथे क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन दिले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कुस्तीला मदत करावी अशी मागणी केली. आपण 40 वर्षात केलेल्या अनेक विकास कामांमुळे राहीबाई व हर्षवर्धन सारखी माणसे घडली असे सांगत हर्षवर्धनच्या पाठीमागे आपण सदैव उभे रहाणार आहे.तो आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्कार मूर्ती हर्षवर्धन सदगीर म्हणाला, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहचलो आहे,आपण मला जी आर्थिक मदत केली त्याचे मी चीज करेल. 2024 चा हिंदकेसरी किताब तसेच आंतरराष्ट्रीय पदक मिळविण्याच्या आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी सर्वेतोपरी प्रयत्न करेल.जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता.तसेच 2013-14 ला नगर येथे कुस्ती मध्ये कांस्य पदक मिळाले.त्यावेळी समशेरपूर येथे आपला सत्कार करण्यात आला होता. त्याचवेळी आपण अकोले तालुक्यातील जनतेचे स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द दिला होता व तो पूर्ण केल्याची आठवण त्याने करून दिली.

बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी कितीही पुरस्कार मिळाले तरी माती आणि माझ्या बियानांशी प्रतारणा करणार नाही,हा त्यांच्याच सन्मान आहे.माझे पाय जमिनीवरच राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, गोरक्षनाथ बलकवडे ,ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे , पुणे येथील काळभैरव देवस्थान चे अध्यक्ष महादेव पठारे, दत्तात्रय भोईर गुरुजी आदींनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र केसरी पै.हर्षवर्धन सदगीर याची महात्मा फुले चौक ते बसस्थानका पर्यंत ढोल,ताशे,लेझीम या पारंपरिक वाद्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. अगस्ती विद्यालय,मॉडर्न हायस्कूल ,जि प प्रा शाळा विरगाव या शाळांची पथके मिरवणूकित अग्रभागी होती. कार्यक्रमास अकोले तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रास्ताविक समितीचे स्वागताध्यक्ष वकील वसंतराव मनकर यांनी केले.स्वागत अकोले तालीम संघाचे अध्यक्ष बबलू धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केले तर आभार राजेंद्र सदगीर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वकील वसंतराव मनकर,
मिनानाथ पांडे,दत्तात्रय भोईर गुरुजी,प्रकाश नाईकवाडी, प्रमोद मंडलिक, हेमंत दराडे, बबलू धुमाळ, बाबासाहेब नाईकवाडी,राजेंद्र सदगीर, पंढरीनाथ चोखंडे,इंजि.मधुकर बिन्नर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

1) माझे वस्ताद काका पवार व गोरक्षनाथ बलकवडे यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला त्याचे आपण मेहनत करून चीज केले व महाराष्ट्र केसरी चा बहुमान मिळविला.हा सन्मान आपण दोन्हीही गुरूंच्या चरणी अर्पण करत असल्याची भावना हर्षवर्धन सदगीर ने बोलून दाखविली.

2) नारीशक्ती व पदमश्री हे सन्मान माझ्या एकटीचे नसून ते माझ्या अकोले तालुक्याचा व काळ्या मातीचे सन्मान आहे. माझ्या या सन्मानात बाएफ जितीन साठे व तालुक्यातील पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे बीज माता राहीबाई पोपेरे यांनी सांगत प्रत्येक गावात हर्षवर्धन तयार व्हावा व बियाणे बँक तयार व्हावी अशी अपेक्ष्याही त्यांनी व्यक्त केली.

Deshdoot
www.deshdoot.com