महाराष्ट्राचा सुपरस्टार’चा स्पर्धक ते सूत्रसंचालक; अभिजीत खांडकेकरशी साधलेला संवाद

jalgaon-digital
4 Min Read

माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय कार्यक्रमातील गुरुनाथ हि व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. हि व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर हा महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि या स्पर्धेनंतर त्याचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. पुन्हा एकदा १० वर्षांनी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. १५ जानेवारीपासून बुधवार गुरुवार हा कार्यक्रम रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे आणि यावेळी अभिजीत या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची धुरा संभाळतोय. त्यानिमित्ताने अभिजित सोबत साधलेला हा खास संवाद

१. १० वर्षांनी पुन्हा एकदा या स्पर्धेचा भाग होऊन कसं वाटतंय?

– एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखा वाटतं आहे. बरोबर १० वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’चा मंच आम्हाला मिळाला. या मंचामुळे मी आणि माझ्यासोबत असलेले अनेक स्पर्धक या स्पर्धेनंतर इंडस्ट्रीमध्ये अभिनय, लेखन, दिग्दर्शन या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि मी तसंच माझ्या सोबत मागील पर्वातील योगेश शिरसाट या कार्यक्रमाचा भाग आहोत याचा मला आनंद आहे. मी सूत्रसंचालन करतोय तर योगेश लेखन व दिगदर्शनाची धुरा संभाळतोय. त्यामुळे यावेळी या कार्यक्रमाचं प्रतिनिधित्व करताना मला खूपच आनंद होतोय.

२. हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे, त्याबद्दल काय सांगशील?

– मला खूप आनंद होतोय कि आता महाराष्ट्रातील होतकरू कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाचा मंच पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. या मंचामुळे सर्व नवख्या कलाकारांना संधी मिळेल आपलं टॅलेंट लोकांपुढे सादर करण्याची आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याची.

३. तुझा या कार्यक्रमातील स्पर्धक म्हणून प्रवास कसा होता?

– प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं कि आपल्याला एक स्टेपिंग स्टोन मिळावा, लोकांपर्यंत आपलं टॅलेंट कसं पोहोचवता येईल याची संधी मिळावी. मी आर.जे. असण्यापूर्वी एकपात्री नाटक, राज्य नाट्य स्पर्धा असं प्रायोगिक स्तरावर बरंच काम केलं होतं. पण मराठी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीमध्ये एंट्री व्हावी असं खूप माझ्या मनात होतं आणि हि सुवर्णसंधी मला महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या निमित्ताने मिळाली. या कार्यक्रमाच्या दरम्यानच आमची दिग्गज दिग्दर्शकांशी ओळख झाली, कारण ते या मंचावर आम्हाला मार्गदर्शन करायला यायचे. किंबहुना कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही ज्यांना ऑडिशनच्या निमित्ताने भेटलो त्या सगळ्यांनीच शो पाहिला होता.

या कार्यक्रमामुळे आमचा स्ट्रगल अर्धा कमी झाला होता असं मला वाटतं. कार्यक्रमानंतर आम्हाला प्रेक्षक ओळखू लागले होते. एखाद्या नवख्या कलाकाराला दिग्दर्शकाकडे कामासाठी पायपीट करताना आपण पाहतो. पण आमच्या बाबतीत तसं झालं नाही कारण झी मराठी वाहिनीने तावून सुलाखुनच कलाकार निवडले असणार अशी खात्री असल्यामुळे आम्ही जिद्दीने आणि मेहनतीने काम मिळवलं. असा वेगळ्याप्रकारचा कार्यक्रम झी मराठी वाहिनीने आणला आणि त्या कार्यक्रमातून आम्ही बरेच स्पर्धक कलाकार म्हणून बाहेर पडलो आणि आजही आम्ही या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहोत. यासाठी सुवर्णसंधी देण्याऱ्या या महाराष्ट्राचा सुपरस्टार कार्यक्रमाच्या मंचाच्या ऋणातून मला मुक्त नाही व्हायचंय.

४. तू जेव्हा या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होतास तेव्हा तू ऑडिशनसाठी कुठला प्रसंग सादर केला होता?

– मी गाजलेली एककांकिका गमभन मधला एक प्रसंग इम्प्रोवाईज करून सादर केला होता.

५. तू या पर्वातील स्पर्धकांना काय सल्ला देशील?

– विजेता कोणीही असो पण या स्पर्धेचा भाग असल्याचा फायदा सर्व स्पर्धकांना होईल. कारण या मंचाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. यावेळी मी कार्यक्रमात सूत्रसंचालनाची धुरा संभाळतोय त्यामुळे धाकधूक कमी आहे कारण मी स्पर्धक नाही आहे, पण सर्व स्पर्धकांचा प्रवास मात्र मी अत्यंत जवळून अनुभवणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *