राज्यातील दोन हजार कोरोनाबाधित रुग्णांना दिला डिस्चार्ज

राज्यातील दोन हजार कोरोनाबाधित रुग्णांना दिला डिस्चार्ज

मुंबई : राज्यात आज १२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २००० रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत ७९० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर एकूण ९७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ६१ हजार ९२ नमुन्यांपैकी १ लाख ४८ हजार २४८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १२ हजार २९६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५२१ आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुणे शहरातील ३, अमरावती शहरातील २, तर वसई विरार मधील १, अमरावती जिल्ह्यामधील १ तर औरंगाबाद मनपामधील १ मृत्यू आहे. याशिवाय प. बंगालमधील एका जणाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २८ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १९ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे.

यापैकी ३ जणांची इतर आजाराबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये (७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com