पुण्यात दोन कोरोना बधितांचा मृत्यू; मृतांची संख्या ३१ वर
स्थानिक बातम्या

पुण्यात दोन कोरोना बधितांचा मृत्यू; मृतांची संख्या ३१ वर

Gokul Pawar

Gokul Pawar

पुणे : राज्यावरील कोरोनाचं सावट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. पुण्यात रविवारी (१२ एप्रिल) दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३१ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक (११ एप्रिलपर्यंत) झाला आहे, याची माहिती महापालिकेने जारी केली आहे. भवानी पेठ परिसरात सर्वाधिक म्हणजे ५६ रुग्ण सापडले आहेत.

पुण्यातील संगमवाडी परिसरातील ५८ वर्षीय आणि सोमवार पेठेतील ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही जडलेले होते.

पुण्यात सकाळपासून गेल्या पाच तासात दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ५८ वर्षाच्या महिलेला ९ एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेला लठ्ठपणा स्लिप अपनिया आणि रक्तदाब असा आजार होता. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी ५६ वर्षीय महिला सोमवार पेठेत राहत होती. तिला ५ एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. तिला रक्तदाबाचा त्रास होता. सकाळी तिचे अवयव निकामी झाल्यामुळे तसेच करोनाची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे ससूनमधील मृतांची संख्या २२ झाली असून पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भवानी पेठ परिसरात सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचं दिसत आहे. दोन दिवसात १६ रुग्णांची वाढ झाल्याने इथे ५६ रुग्णसंख्या झाली आहे. कसबा-विश्रामबाग वाडा भागात २९, तर धनकवडी-सहकारनगरमध्ये १४ रुग्ण आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com