बीड : एकाच मांडवात आठशे मुलींचे बारसे; पुढील वर्षी हजार मुलींचे नामकरण
स्थानिक बातम्या

बीड : एकाच मांडवात आठशे मुलींचे बारसे; पुढील वर्षी हजार मुलींचे नामकरण

Gokul Pawar

Gokul Pawar

बीड । बीडमधील आजचा दिवस पुरोगामी महाराष्ट्राला सुखद ठरला. स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत करण्याचा सामुदायिक सोहळा अनोख्या पद्धतीने पार पडला. एकाच मांडवात एक-दोन नव्हे तर 836 मुलींच्या बारशाचा कार्यक्रम झाला. मंजूळ संगीताच्या तालात झुलणारे पाळणे, बारशाची गीते, नातलगांना मिठाईवाटप, पाहुण्यांची धावपळ अशा भारावलेल्या वातावरणात नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. खासदार प्रीतम मुंडे यांनी या सर्व मुलींच्या आत्याची भूमिका चोखपणे बजावली.

बीड शहरातील स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या सोळाव्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाच्या मंडपात सामुदायिक बारशाचा हा सोहळा रंगला. सप्टेंबर ते डिसेंबर 2019 या कालावधीत जन्मलेल्या 836 मुलींच्या नामकरणाचा हा सोहळा जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या पुढाकाराने ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’, ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’या राष्ट्रीय उपक्रमांतंर्गत आयोजित करण्यात आला. प्रतिष्ठानचे या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे.

या विश्वविक्रमाची नोंद गोल्डन बुक व वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. कार्यक्रमास बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे ‘वंडर बुक रेकॉर्ड’च्या भारतातील हैद्राबादच्या समन्वयक डॉ.स्वर्ण श्री गुराम,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. प्रतिभा थोरात उपस्थित होते.‘स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा’ म्हणून बीडची आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे.या कार्यक्रमात आत्या नव्हे, तर मावशी म्हणून यायला मला आवडेल, असे खासदार मुंडे म्हणाल्या. यावेळी 836 मुलींचे पाळणे हलवण्यात आले.

मुलींच्या आत्यांनी मुलींना कानात सूचवल्याप्रमाणे नामकरण झाले.आपल्या मुलीचा एवढा सुंदर आणि आगळावेगळा नामकरण सोहळा होत असताना पाहून मुलींच्या मातांच्या आनंदाला पारावर उरला नाही.नामकरण सोहळ्याला मुलींचे कुटुंबीय आणि नातलगांनी आवर्जून हजेरी लावली.

एरव्ही चार भिंतीच्या आत होणार्‍या बारशाला घरातील लोक आणि जवळचे नातलग हजर राहतात.बीडमध्ये मात्र हजारो लोकांच्या उपस्थितीत आपल्या मुलीचा नामकरण सोहळा झालेला पाहून मुलींच्या माताचा आनंद गगनात मावत नव्हता. ‘मेरी घर आयी नन्ही परी’ ‘मोगरा फुलला’, ‘छोटी सी नन्ही सी प्यारी सी आयी परी’ यांसारखी लोकप्रिय गाणी तसेच बारशाची गाणीही सादर करण्यात आली.

पुढील वर्षी 1001 मुलींचे नामकरण
एक हजार मुलांमागे बीड जिल्ह्यात 810 मुली होत्या, मात्र आरोग्य यंत्रणेने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमाची चांगली अंमलबजावणी केली. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी परिश्रम घेतले. त्यामुळे 2018-19 मध्ये मुलींचा एक हजार मुलांमागे जन्मदर 961 वर पोहोचला आहे. एकाच मांडवात मुलींच्या सामुदायिक नामकरणाचा सोहळा आयोजित करताना समाधान मिळते. पुढील वर्षी 1001 मुलींचा नामकरण सोहळा आयोजित करण्याचा संकल्प आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खतोड यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com