राज्यातील ८७ टक्के उमेदवार म्हणतात, महापरीक्षा पोर्टल बंद करा
स्थानिक बातम्या

राज्यातील ८७ टक्के उमेदवार म्हणतात, महापरीक्षा पोर्टल बंद करा

Gokul Pawar

नाशिक । शासकीय भरतीसाठी घेण्यात येणार्‍या स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या राज्यातील 87 टक्के उमेदवारांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या बाजूने कौल दिला आहे; तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी संयुक्त परीक्षा विभक्त करण्यात यावी, असे 80 टक्के उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे उमेदवारांच्या कौलानुसार राज्य सरकार निर्णय घेणार का, याकडे राज्यातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकारमध्ये सत्ताबदल झाल्यानंरही स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या उमेदवारांच्या मागण्या ‘जैसे थे’ असल्याने, उमेदवारांनी आता मागण्यांच्या पूर्ततेसाठी 5 ते 10 जानेवारीदरम्यान ऑनलाइन व्होटिंग पोल (मतदानाचा कल) घेतला. या व्होटिंग पोलमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या ‘एमपीएससी स्टुडंट राइट्स’च्या फेसबुक पेज आणि यू-ट्यूब चॅनेलच्या लिंकवर मतदान केले.

या पोलमध्ये राज्यातील 44 हजार 477 उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने मतदान केले. त्यानुसार सरकारी भरतीसाठी निर्माण केल्या महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दुरुस्त न करता ते कायमचे रद्द करण्याच्या बाजूने 87.2 टक्के उमेदवारांनी कौल दिला आहे. तर, तीन पदांसाठी घेण्यात येणारी संयुक्त परीक्षा विभक्त करावी, असे 80.8 टक्के उमेदवारांना वाटते.

याशिवाय राज्यसेवा परीक्षेतील पेपर क्रमांक 2 सी-सॅट हा विषय निकालासाठी पात्र करण्याच्या बाजूने 63.9 टक्के उमेदवारांनी कौल दिला आहे; तर, 36.1 उमेदवारांनी विरोधात निकाल दिला आहे, अशी माहिती ‘एमपीएससी स्टुडंट राइट्स’चे किरण निंभोरे, महेश बडे, साई डहाळे, विजय मते यांनी दिली. या पोलच्या निर्णयाची माहिती; तसेच तपशील राज्य सरकारला देऊन, उमेदवारांच्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com