Thursday, April 25, 2024
Homeनगरवाहने जप्त करण्याची मोहीम दुसर्‍या दिवशीही

वाहने जप्त करण्याची मोहीम दुसर्‍या दिवशीही

सोमवारी दोनशे वाहने जप्त; वाहन चालक, मालकांवर गुन्हे दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसह जिल्ह्यात कलम 144 नुसार जमावबंदी व संचारबंदी असल्याने या काळात नगरमधील नागरिक सातत्याने बाहेर पडत आहेत. पोलिसांनी सोमवारी दुसर्‍या दिवशीही दिवसभर दुचाकी, चारचाकी, रिक्षा अशा सुमारे दोनशेपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करत ते जप्त करून वाहन मालकांवर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisement -

प्रशासनाकडून जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवली आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही लोक वारंवार घराबाहेर पडताना प्रशासनाच्या लक्षात आले. लोक सातत्याने बाहेर पडत आहे. त्यात जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. यामुळे धोका अधिक गडद झाला आहे. संचारबंदी नियमानुसार भाजी, किराणा, मेडिकल खरेदीसाठी कोणतेही खासगी वाहन वापरण्यास बंदी आहे. वारंवार वाहने घेऊन बाहेर पडणार्‍या लोकांवर रविवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी वाहन जप्तीची मोहीम हाती घेतली.

रविवारी दिवसभर वाहने जप्त करून देखील सोमवारी काही लोक वाहने घेऊन घराबाहेर पडले. अशा लोकांवर पोलिसांनी वाहन जप्तीची मोहीम सुरूच ठेवली. डीएसपी चौक, सावेडी परिसरातील भिस्तबाग, प्रोफेसर कॉलनी चौक, एकविरा चौक, नेप्ती नाका, चितळेरोड, बालिकाश्रम रोड, दिल्लीगेट, मार्केट यार्ड परिसर, केडगाव परिसर, भिंगार परिसरात पोलिसांनी दोनशे पेक्षा जास्त वाहने जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केली. संबंधित वाहन चालक, मालकांविरोधात पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. दिवसभरात कोतवाली, भिंगार, तोफखाना पोलीस ठाण्यात सुमारे दोनशे पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली.

पार्किंगला जागा अपुरी
विनाकारण घराबाहेर पडणार्‍या लोकांची रविवारी चारशे तर सोमवारी दोनशे पेक्षा जास्त वाहने जप्त करून ते शहरातील भिंगार, कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्यात आणली जातात. पोलीस ठाण्यासाठी आधीच अपुरी जागा, आता वाहने जप्त करून आणल्याने आता पोलिसांच्या पार्किंगलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे पार्किंगसाठी व्यवस्था करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या