कुकडीच्या पाण्यासाठी पुणेकरांचा दबाव

कुकडीच्या पाण्यासाठी पुणेकरांचा दबाव

अहमदनगर – एखाद्या गोष्टीत अपयश आले की अभ्यास कमी पडतो, असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे मी पुन्हा अभ्यास करतोय, पक्षाने सांगितलेल्या ध्येय धोरणानुसार आता पुढे जात आहे , असे मत माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच कुकडीचे पाणी कर्जत, जामखेड ला मिळालेला नाही. त्याला पुण्याचा दबाव दिसून आला आहे, असा आरोप करत 1 जून रोजी कर्जत येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

यासंदर्भात राम शिंदे म्हणाले की, मज्यावेळेला विधानपरिषदेच्या उमेदवारी बदलल्या त्यावेळेला मी एक ट्विट करून माझा विषय मांडला होता. अभ्यास कमी पडला म्हणून आपण मागे पडलो असेच म्हणावे लागेल. आता मी पक्षाने दिलेले काम ध्येयधोरणे पुढे घेऊन वाटचाल करत आहे. त्यावेळची परिस्थिती तशी होती म्हणून तशा प्रकारची मी ट्विट केले, अशी स्पष्टोक्ती राम शिंदे यांनी दिली.

कुकडी मध्ये पाणी असताना देखील सुद्धा नगर जिल्ह्याला पाणी मिळत नाही. पुण्याचा दबाव यासंदर्भात वाढत चाललेला आहे, असे दिसून येत आहे. वास्तविक पाहता पाणी सोडण्याचे काम हे कालवा समितीच्या असते. मात्र पाटबंधारे मंत्री यांनी यामध्ये लक्ष दिले नाही, हे सुद्धा आता पुढे येत आहे. त्यामुळे कर्जत जामखेड मधील जनताही पाण्यावाचून वंचित राहणार आहेत.

नियोजन नसल्यामुळे असा प्रकार घडला आहे , असा आरोप राम शिंदे यांनी करून नगर जिल्ह्याला पाणी देताना पुण्याचा मंत्र्यांचा दबाव वाढत चालला आहे , असे दिसून येत आहे .आज फळबागांना पाणी नाही . जनावरांना पाणी मिळू शकत नाही, अशी जर अवस्था असेल तसेच मीटिंग घ्यायला यांना वेळ नसेल, तर नगरच्या जनतेला पाणी मिळणार कसे ? म्हणून 31 तारखेपर्यंत आम्हाला पाणी मिळाले नाही, तर मी दिनांक 1 जून रोजी कर्जत येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनाने चांगले नियोजन करून यंत्रणा हाताळली . मात्र राजकीय पाठबळ त्यांना मिळाले नाही , असा आरोपही राम शिंदे यांनी केला. वास्तविक पाहता जिल्ह्यातील मंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने दिलासा देण्याचे काम जनतेला करायला पाहिजे होते, तेच केले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com