Wednesday, April 24, 2024
Homeनगरजामखेडमध्ये तपासणीसाठी ३१ जणांना घेतले ताब्यात

जामखेडमध्ये तपासणीसाठी ३१ जणांना घेतले ताब्यात

तालुक्यातील धार्मिक स्थळे देखील केली सील

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- बारा दिवसांपासून जामखेड येथिल काझी गल्लीतील धार्मिक स्थळांमध्ये आढळून आलेल्या १० परदेशी व ४ इतर राज्यातील अशा चौदा नागरिकांपैकी दोन जणांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह निघाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत चौदा लोकांच्या संपर्कात आलेल्या ३१ लोकांना ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी नगरला पाठविले आहे. त्याचबरोबर शहरासह तालुक्यातील मुस्लीम समाजाची प्रार्थना स्थळे सील केले आहेत.

- Advertisement -

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १४ मार्च रोजी नगर येथील मुकुंदनगर भागातून आशिया खंडातील आयव्हरी कोस्ट, इराण, टांझानिया या देशातील १० जण तर मुंबई व तामिळनाडू येथिल ४ जण असे एकूण १४ नागरीक जामखेड येथिल काझी गल्लीतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दि. २६ मार्च पर्यंत म्हणजे बारा दिवस वास्तव्यास होते. याबाबत संबंधित स्ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी याची कल्पना प्रशासनाला न दिल्यामुळे तसेच जमावबंदी आसतानाही धार्मिक स्थळांमध्ये १४ नागरीक वास्तव्यास ठेवल्यामुळे स्ट्रस्टच्या तीन जणांविरोधात कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच या धार्मिक स्थळातील चौदा जणांना तातडीने नगरला जिल्हा रूग्णालयात तपासणी साठी दाखल करण्यात आले होते. यातील पाच जणांचे स्त्राव नमुने तपासणी साठी जिल्हा रुग्णालयातून पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. याचा अहवाल रविवार दि. २९ रोजी प्राप्त झाला यानुसार यातील दोन जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला तर नऊ जणांचा अहवाल येणे बाकी आहे.

यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले व या चौदा जणांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये रविवार दि २९ रोजी १८ जणांना तर सोमवार दि ३० रोजी १३ जणांना अशा एकुण ३१ जणांना तातडीने स्रावाचे नमुने तपासणीसाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या मध्ये काही संपर्कात आलेल्या जामखेड येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

यानंतर महसूल प्रशासनाचे तातडीने पावले उचलत सोमवार दि. ३० रोजी मुस्लिम समाजाचे तालुक्यातील राजुरी, लोणी, सांगवी ( मुसलमानवाडी), लोणी, बावी, हळगाव, दिघोळ, पाटोदा, धनेगांव, फक्राबाद व पिंपळगाव आळवा सह शहरातील काझी गल्ली व खर्डा चौकातील दोन ठिकाणचे प्रार्थना स्थळे सील करण्यात आली आहेत अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.

जामखेड येथे वास्तव्यास असलेले दोन परदेशी नागरिक कोरोना बाधित आढळल्याने खबरदारी म्हणून जामखेड शहराच्या हद्दीतील बस स्थानकाजवळील जिजाऊ नगर, खर्डा रोडवरील लक्ष्मी चौक, बीड काॅर्नर, भुतवडा रोड, साकत फाटा, येथिल रस्ते सील करण्यात आले आहेत. तसेच रस्त्यावर फिरणार्‍यां नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या