अकोले : इंदोरी येथे बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळली
स्थानिक बातम्या

अकोले : इंदोरी येथे बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळली

Sarvmat Digital

इंदोरी (वार्ताहर)– अकोले तालुक्यातील इंदोरी येथे आज सकाळी 9 च्या सुमारास एका ऊसाच्या शेतात बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळली. सदर मादीचा दोन ते तीन दिवसांपुर्वीच मृत्यू झाला असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली होती.

इंदोरीच्या पुर्वेला सर्वे नं. 2 मध्ये बाळासाहेब गायकवाड यांच्या शेतात तीन वर्ष वयाच्या बिबट्या मादीचा मृतदेह शेतामध्ये काम करणार्‍या ग्रामस्थांना आढळून आला. गायकवाड यांच्या शेतात एका झाडाखाली हा बिबट्या मृतावस्थेत पडलेला होता. दुर्गंधीमुळे ग्रामस्थांना शंका आल्याने दुर्गंधीच्या दिशेने गेल्यावर मृतावस्थेतील मादी ग्रामस्थांना निदर्शनास मिळाली.

संबंधित ग्रामस्थांनी इंदोरीचे पोलीस पाटील अशोक नवले यांना या गोष्टीची कल्पना दिल्यानंतर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे वनपाल एल. पी. शेंडगे, वनरक्षक डी. बी. कोरडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करुन पंचनामा केला. सदर मादी बिबट्याचा मृतदेह सुगाव येथील नर्सरीत नेवून तेथे पशुवैद्यकिय अधिकारी श्री. भांगरे यांनी शवविच्छेदन केले व अंत्यसंस्कार करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com