Friday, April 26, 2024
Homeक्रीडापाकचा धुव्वा; भारत अंतिम फेरीत

पाकचा धुव्वा; भारत अंतिम फेरीत

यशस्वी जैस्वालचं नाबाद शतक

पोटशेफस्ट्रुम – 19 वर्षाखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा संघाने पाकिस्तानच्या युवा संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पाकिस्तानने दिलेले 173 धावांचे आव्हान टीम इंडियाने 10 गडी राखून सहजपणे पार केले. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालने या महत्त्वाच्या सामन्यात 113 चेंडूत नाबाद 105 धावांची खेळी केली. तर, दिव्यांश सक्सेनाने नाबाद 59 धावांची खेळी साकारली. यशस्वीला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

- Advertisement -

भारतीय सलामीवीरांनी डावाची सुरुवात आश्वासक केली. पाकिस्तानी गोलंदाजांना अंदाज घेत दोन्ही सलामीवीरांनी धावा जमवण्यास सुरुवात केली. खेळपट्टीवर जम बसवल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी फटकेबाजी करायला सुरुवात केली. यशस्वी जैस्वालने पाकच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत यशस्वीने पाक गोलंदाजांना चांगला तडाखा दिला. एकही गोलंदाज भारताची ही जोडी फोडू शकला नाही. भारताकडून दिव्यांश सक्सेनाने 59 धावा करत यशस्वीला चांगली साथ दिली.

त्याआधी, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोई यांनी केलेल्या धडाकेबाज मार्‍याच्या जोरावर भारताने उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा डाव 172 धावांत संपवला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार रोहिल नाझीरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या उभारुन भारताला कडवं आव्हान देण्याचा पाकचा प्रयत्न होता, मात्र भारतीय गोलंदाजांच्या मार्‍यासमोर पाकचे फलंदाज पुरते गळपटले. सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहिल नाझीर यांचा अपवाद वगळता पाकच्या सर्व फलंदाजांनी निराशा केली.

पाकिस्तानचे फलंदाज ठाराविक अंतराने बाद होत गेले. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मद हुरैर याला चार धावांवर बाद करत सुशांत मिश्राने पहिला धक्का दिला. त्यानंतर रवी बिश्नोईने फहाद मुनीरची विकेट घेतली. मुनीर बाद झाला तेव्हा पाकची अवस्था 2 बाद 35 अशी होती. त्यानंतर हैदर अली आणि नाझर यांनी तिसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. पण रवीने हैदरची विकेट घेत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या कासीम 9 धावांवर रनआऊट झाला. मोहम्मद हारिसची विकेट घेत सुशांतने पाकिस्तानला सहावा धक्का दिला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या तळातील फलंदाजांना झटपट बाद केले. पाकिस्तानचा संघ 43.1 षटकात 172 धावांवर बाद झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या