इगतपुरी : सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या
स्थानिक बातम्या

इगतपुरी : सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी । सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील टाकेद येथे घडली. पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान टाकेद येथील एका विवाहितेस आपल्या पतीचे घरातच अनैतिक संबंध निदर्शनास आल्याने तिने संबधास विरोध केला. तिने विरोध केल्याने पतीसह घरातील इतर मंडळींनी छळ सुरू केला. हा छळ असह्य झाल्याने गर्भवती असलेल्या विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत घोटी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयित पतीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान यातील सासू, दीर आणि जाऊ हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालेगाव तालुक्यांतील आघार येथील रीना हीचा टाकेद येथील संदीपसिंग पंढरीनाथ परदेशी याच्याशी विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर आपल्या पतीचे आपल्याच घरात असलेले अनैतिक संबध विवाहिता रीना हिच्या निदर्शनास आले होते.

या प्रकाराला विरोध केल्याने रीना हिचा पती संदीपसिंग परदेशी, सासू लताबाई पंढरीनाथ परदेशी, दीर बाळू पंढरीनाथ परदेशी व जाऊ वैशाली बाळू परदेशी हे शारीरिक व मानसिक छळ करीत होते. या छळास कंटाळून अखेर विवाहिता रीना हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान सदरची विवाहिता चार महिन्याची गर्भवती असल्याने तिच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान याबाबत पोलिसांनी पती संदीपसिंग परदेशी यास अटक केली असून उर्वरित संशयित फरार आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल धुमसे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com