इगतपुरी : तब्बल तीस वर्षानंतर भागणार टाकेघोटीची तहान
स्थानिक बातम्या

इगतपुरी : तब्बल तीस वर्षानंतर भागणार टाकेघोटीची तहान

Gokul Pawar

शेणित : मुंबई – आग्रा महामार्गालगत असलेल्या टाकेघोटी गावाला दारणा नदी वळसा घालून गेलेली असताना तसेच या नदीतून त्रिंगलवाडी, भावली, वाकी खापरी धरणातील पाण्याचा अखंडपणे विसर्ग होत असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे गावाला पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. ही व्यथा जाणून घेऊन अखेर शासनाने या गावाला तब्बल ८० लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याने या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याने नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे महामार्गावरील गाव आहे. गावाला दारणा नदी वळसा घालून गेलेली आहे. मात्र तब्बल तीस वर्षांपूर्वी या गावाला शासनाने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली होती. मात्र गावाचे विस्तारीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे गावाला गेली अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या पाणीटंचाईमुळे गावातील महिलांना महामार्ग ओलांडून,जीव मुठीत धरून लगतच्या नदीत खड्डे खोदून पाणी आणावे लागत होते.

याबाबत गावच्या सरपंच सौ. रमण आडोळे यांच्यासह रामदास आडोळे, दशरथ आडोळे, अर्जुन आडोळे, गौतम पगारे आदींनी सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर करावी यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने या गावाला तब्बल ८० लाख रुपये निधीची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.

या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांनी अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सरपंच सौ.रमण आडोळे यांच्यासह रामदास आडोळे, दशरथ आडोळे, अर्जुन आडोळे , गौतम पगारे, ग्रामसेवक पवार, मिलिंद जगताप आदीसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com