इयत्ता सातवीत रंगभूमीवर पाऊल ठेवणारे जेष्ठ अभिनेते ‘जयराम कुलकर्णी’

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते आज मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या यात त्यांनी सहायक अभिनेता म्हणून काम केले. सोलापूर येथील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. काही दिवसांपूर्वी जयराम यांनी भूमिका साकारलेला खेळ आयुष्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

चल रे लक्ष्या मुंबईला खट्याळ सासू नाठाळ सून, खरं कधी बोलू नये, झपाटलेला, धुमधडाका, माझा पती करोडपती अशीही बनवाबनवी असे अनेक चित्रपट गाजले. शाळेत असल्यापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. सातवीत असताना त्यांनी मोरूची मावशी या नाटकात मावशीचे काम केले होते. हा त्यांचा रंगभूमीवरील पहिला प्रवेश ठरला.

१९५६ मध्ये आकाशवाणी पुणे केंद्रात त्यांनी नोकरी सुरु केली. व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून जयराम यांची निवड झाली होती . माडगूळकर लेखनाशी जयराम कुलकर्णी यांचा जवळचा संबंध आला. मराठी सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम कुलकर्णी यांना पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी दिली. कोल्हापूर आणि मुंबई येथे चित्रीकरण असल्याने त्यांना बऱ्याचदा तारेवरची कसरत करावी लागली. १९७० मध्ये आकाशवाणीची नोकरी सोडली. आणि ते अभिनय क्षेत्राकडे वळले. आकाशवाणीमुळे यावेळचे मोठे कलाकार आणि साहित्यकांशी त्यांची ओळख झाली होती. चित्रपटात काम करताना याच गोष्टींचा त्यांना फायदा झाला. जयराम कुलकर्णी हे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे सासरे होत. चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम समीकरणाने प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहू लागला.

सुरुवातीला सरपंच, पाटील या भूमिका चित्रपटातून त्यांनी साकारल्या. पण नंतर गंमत जम्मत, दे दणादण, झपाटलेला, नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या. जयराम यांचे सुपुत्र वकील असून, कॉलेजमध्ये असताना अंमलदार नाटकात त्यांनी हणम्या भूमिका साकारली.

कुलकर्णी यांनी कसदार अभिनयाने अनेक भूमिका ना केवळ जिवंत केल्या परंतू त्या अजरामरही केल्या. खणखणीत आवाज, भाषेतील ग्रामीण ढब यामुळे त्यांनी साकारलेल्या पाटील, सरपंच भूमिका कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. त्यांनी आकाशवाणीसाठी खास ग्रामीण भाषेत केलेले कार्यक्रम श्रोत्यांच्या चांगलेच पसंतीस पडले. आपल्या सादरीकरणातून त्यांनी स्वत:चा एक श्रोतृवर्ग त्यावेळी तयार केला होता. मराठी चित्रपट सृष्टीतील एक ज्येष्ठ तारा आज निखळला.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *