८० वर्षांच्या आजोबांची भूमिका  साकारणं खरोखर आव्हानात्मक होतं : दिलीप प्रभावळकर

८० वर्षांच्या आजोबांची भूमिका  साकारणं खरोखर आव्हानात्मक होतं : दिलीप प्रभावळकर

सुंदर आणि सोपी मांडणी, प्रत्येक घरातली गोष्ट पडद्यावर मांडावी इतकं खरं वाटेल असं कथानक आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय यामुळे जवळपास २० वर्षांपूर्वी सुरु झालेली मालिका ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ हि आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हि मालिका आता पुन्हा एकदा १५ जून पासून झी मराठीवर संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच निमित्ताने दिलीप प्रभावळकर यांच्या सोबत साधलेला खास संवाद

१. तुम्ही साकारलेली गंगाधर टिपरे यांची भूमिका अजरामर आहे, हि भूमिका स्वीकारताना काय भावना होत्या?

– गंगाधर टिपरे उर्फ आबा हि भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. केदारने मला गंगाधर टिपरे यांच्या भूमिकेसाठी जेव्हा विचारणा केली तेव्हा माझ्यासाठी ८० वर्षांच्या आजोबांची भूमिका साकारणं खरोखर आव्हानात्मक होतं. पण हि भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे.

२. या मालिकेचं लोकप्रिय होण्याचं रहस्य काय होतं?

– या मालिकेचा भाग आठवड्यातून एकदाच प्रसारित व्हायचा. चित्रीकरण करताना केदार आमच्यातील कलाकाराला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचा आणि कलाकारांच्या उस्त्फुर्त काम करण्याला तो प्राधान्य द्यायचा. साधेपणा हा मालिकेचा आत्मा होता. खलनायक, सासू-सुनेचं भांडण आणि जोडप्याचे विवाह बाह्य संबंध असे कुठल्याही प्रकारचे कथानक नसल्यामुळे हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

३. या मालिकेचा जन्म कसा झाला?

– हि मालिका माझ्या ‘अनुदिनी’ या कथासंग्रहावर आधारित आहे. यात मी ३ पिढ्यांतील ५ व्यक्तींची रोजनिशी मांडली होती. या रोजनिशीद्वारे चालू घडामोडींवर मार्मिक पद्धतीने टिप्पणी करण्यात येत होती. लेखनाद्वारे मी या पाच भिन्न विचारसणीच्या लोकांचे भावविश्व् चितारत होतो. याच कथांचे नंतर पुस्तक प्रकाशित झाले आणि ते केदार शिंदेंच्या वाचनात आले. त्याच्या डोळ्यांसमोर कथांची संपूर्ण मालिकाच उभी राहिली आणि अशा प्रकारे ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेचा जन्म झाला.

४. हि मालिका इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल.

– जवळपास पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा हि मालिका टीव्हीवर पाहायला खरच खूप मजा येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण कुटुंबाचं पुरेपूर मनोरंजन हि मालिका करेल आणि संपूर्ण कुटुंबाला व सर्व पिढयांना पुन्हा एकदा एकत्र आणेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com