औषधांचा ट्रक लुटणारे टोळके जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
स्थानिक बातम्या

औषधांचा ट्रक लुटणारे टोळके जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर विल्होळी येथून 16 लाख रूपयांची औषधे असलेला ट्रक चोरटे पळवून नेत असताना नाशिक तालुक्यातील मुंगसरा शिवारात तो पलटी झाल्याची घटना घडली होती. हा ट्रक लुटणार्‍या चौघांच्या टोळक्यास ग्रामिण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

संदिप शिवाजी गायकवाड (32, रा. वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर), आकाश शिवाजी गायकवाड (22, रा. वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर), गणेश पाराजी गांगुर्डे (28, रा. तळेगाव काचुर्ली ता. त्र्यंबकेश्वर/ तीघेही रा. सध्या महिरावणी) राहुल कारभारी जाधव (मुळेगाव, ता. नाशिक, सध्या रा. भंदुरे वस्ती, सातपूर)अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिककडून मुंबईकडे औषधसाठा घेऊन जाणारा ट्रक (एमएच 04-सीए-7764) चोरट्यांनी चालकास मारहाण करून रविवारी (दि.22) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विल्होळी शिवारातून पळवला होता. याप्रकरणी ट्रकचालकाने वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

चोरटे भरधाव ट्रक गिरणारेमार्गे मुंगसरा, दरी, मातोरी रस्त्याने पेठरोडकडे घेऊन जात असताना मुंगसरा शिवारात पलटी झाला. लाखो रूपयांचा औषधसाठा व ट्रक रात्रीपासून रस्त्याच्या कडेला पडून असल्याने सोमवारी (दि.23) ग्रामस्थांंनी नाशिक तालुका पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तत्काळा तपास सुरू केला होता.

जिल्ह्याच्या अधिक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने याचा समांतर तपास सुरू केला होता. विल्होळीत घटना घडलेल्या भागातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता संशयित चौघे त्यात आढळून आले. त्यांची चौकशी करता हे जिंदाल कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत असल्याचे समोर आले.

पोलीसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना घरून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता. कामावरून सुटल्यानंतर घरी येत असताना त्यांनी सबंधीत ट्रक हात करून थांबवला होता. त्यात बसून येत असताना चालकास हातातील डब्याने मारहाण करत त्यास जैन मंदिराजवळ उतरवून देण्यात आले होते.

तर हा ट्रक घेऊन चौघे पळून जात असताना ट्रक मुंगसरा परिसरात पलटी झाला. यामध्ये चौघांनाही जखमा झाल्या आहेत. पोलीसांनी ट्रक हस्तगत केला असून चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक के.के. पाटील, सहायक निरिक्षक स्वप्नील राजपुत, सागर शिंपी व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Deshdoot
www.deshdoot.com