‘जेईई’ मुख्य परीक्षेला सुरवात; ‘असा’ करा अभ्यास
स्थानिक बातम्या

‘जेईई’ मुख्य परीक्षेला सुरवात; ‘असा’ करा अभ्यास

Gokul Pawar

नाशिक । देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजेसमधील प्रवेशांसाठी घेतली जाणारी जेईई मेन्स परीक्षा (दि. 6) सोमवारपासून सुरू झाली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने 6 ते 9 जानेवारीदरम्यान ही परीक्षा घेतली जाईल.

एनआयटी,आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित कॉलेजेसमधील प्रवेशांसाठी वर्षातून दोनवेळा ही परीक्षा घेण्यात येते. जानेवारीतील परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये ही परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. नव्या प्रश्नपत्रिकेत एकूण प्रश्नांची संख्या पूर्वीपेक्षा कमी करण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला आहे.

यामुळे, एकंदर काठिण्य पातळीतही बदल होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा कॉम्प्युटर आधारित पद्धतीने घेतली जाईल. केमिस्ट्री, गणित आणि फिजिक्स या विषयावरील बहुपयोगी आणि गणिती प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात येतील. विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने आणि कोणतेही गैरप्रकार न करता परीक्षा द्यावी असे आवाहन नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केले आहे. जेईई किंवा इतर परीक्षांसाठी विविध ठिकाणांवरून विद्यार्थी परीक्षेला येत असतात.

परीक्षा केंद्रांवर किती वाजता पोहोचावे, याची अंतिम वेळ विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रवेशपत्रावर देण्यात आली आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर पोहोचावे. प्रवेशद्वार बंद होण्याच्या वेळेनंतर विद्यार्थी पोहोचल्यास त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी अनेक औपचारिक गोष्टी विद्यार्थ्यांना कराव्या लागतात. त्यामुळे पुरेशा वेळेआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचावे आणि कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची, काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन एनटीएने केले आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा-
*डाउनलोड केलेले प्रवेशपत्र, वैध फोटो ओळखपत्र जवळ बाळगा
*आवश्यक असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र बाळगा.
* कंपास बॉक्स, हँडबॅग, पर्स, स्टेशनरी, खाण्याचे पदार्थ आणि पाणी, मोबाइल फोन्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घड्याळ यापैकी कोणतीही वस्तू केंद्रावर आणू नये.
*पेन, पेन्सिल आणि कोरा कागद केंद्रावर पुरविला जाईल.

परीक्षेच्याआधी-

*पूर्ण अभ्यासक्रम वाचण्याऐवजी मुद्यांवर आधारित उजळणी करा.
* अभ्यासाविषयी गोंधळ उडू देऊ नका.
*मित्रांचा किंवा अनावश्यक पुस्तकांचा प्रभाव पडू देऊ नका.
*योग्य आहार, पुरेशी झोप आणि ताण येऊ न देणे याकडे लक्ष द्या.
*फोन आणि इंटरनेटवर जास्तीचा वेळ घालवू नका.

Deshdoot
www.deshdoot.com